Home /News /sport /

टीम इंडियाचा क्रिकेटपटू बनला 'सोनू सूद', गरजूंना करतोय हवी ती मदत

टीम इंडियाचा क्रिकेटपटू बनला 'सोनू सूद', गरजूंना करतोय हवी ती मदत

टीम इंडियाचा 'हा' क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये असला भारतात असलेल्या गरजू व्यक्तींना मदत पोहोचवण्याचं काम करत आहे.

    मुंबई, 17 मे : कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) संकटात बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेले वर्षभर गरजूंची मदत करत आहे. टीम इंडियाचा खेळाडू हनुमा विहारी (Hanuma Vihari) यानेही सोनू सूदच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. इंग्लंडमध्ये असला तरी हनुमा विहारी भारतात असलेल्या गरजू व्यक्तींना मदत पोहोचवण्याचं काम करत आहे. हनुमा विहारीसोबत हैदराबाद आणि इतर शहरांमधले 100 स्वयंसेवक आहेत. जेव्हा एखादा गरजू हनुमा विहारीला मदतीसाठी ट्वीट करतो तेव्हा हे स्वयंसेवक ही मदत पोहोचवण्याचं काम करतात. हनुमा विहारीने आत्तापर्यंत अनेक लोकांना ऑक्सिजन, जीवनावश्यक औषधं आणि आर्थिक मदतही पोहोचवली आहे. ज्याठिकाणी गरजूंना मदत पोहोचवणं शक्य होत नाही, तिकडे विहारी सोनू सूद आणि भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.वी. यांचीही मदत मागत आहे. विशाखापट्टणममध्ये म्यूकर मायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस झालेल्या व्यक्तीला इंजक्शनची गरज होती, यासाठी त्याने सोनू सूदची मदत मागितली. हनुमा विहारीच्या सांगण्यावरून भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.वी. यांनी एका रुग्णासाठी प्लाझ्माची सोय करून दिली. विहारीने याबद्दल श्रीनिवास यांचे आभारही मानले. हेमंत कुमार नीली नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर सोनू सूदला टॅग करत वडिलांसाठी विशाखापट्टणममध्ये ऑक्सिजन बेडची गरज असल्याची मागणी केली. त्यांची ऑक्सिजन लेव्हल 80 च्या खाली आली होती आणि त्यांना लगेचच उपचाराची गरज होती. यानंतर विहारीने हेमंत कुमार यांना वडिलांची सगळी माहिती द्यायला सांगितली, ज्यामुळे ऑक्सिजन बेड उपलब्ध करता येईल. हनुमा विहारीने त्याच्या या मोहिमेबाबत पीटीआयसोबत बातचित केली होती. मला लोकांची मदत करायची आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना बेड आणि ऑक्सिजनही मिळत नाही, या कठीण काळात नागरिकांची मदत करायचं मी ठरवलं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचवावी, हा माझा प्रयत्न आहे, असं हनुमा विहारी म्हणाला. हनुमा विहारी हा सध्या इंग्लंडमध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि भारत-इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजसाठीच्या टीममध्ये विहारीची निवड झाली आहे. काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी विहारी आधीच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे.
    First published:

    Tags: Cricket, Hanuma vihari

    पुढील बातम्या