भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत चौथं स्थान पटकावलं होतं. ही ऐतिहासिक कामगिरी पाहण्यासाठी भारतीय चाहते मध्यरात्रीपर्यंत जागे राहिले. दीपामुळेच जिम्नॅस्टिक हा खेळ भारतात लोकप्रिय झाला. दीपा रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती; मात्र नंतर डोप चाचणीत अयशस्वी झाल्यामुळे तिच्यावर 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. तिच्यावरच्या बंदीचा कालावधी 10 जुलै रोजी संपणार असल्यामुळे ती 11 आणि 12 जुलै रोजी भुवनेश्वर येथे होणाऱ्या आशियाई खेळांच्या निवड चाचणीमध्ये भाग घेऊ शकणार आहे. त्रिपुरातल्या 29 वर्षीय दीपाचा भारतीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनने मे महिन्यात संभाव्य खेळाडूंच्या यादीत समावेश केला होता. 2014च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक आणि हिरोशिमा इथे 2015 मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत दीपाने कांस्यपदक पटकावलं होतं. 2018मध्ये तुर्कीत झालेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपच्या व्हॉल्ट स्पर्धेत दीपानं अव्वल स्थान पटकावलं होतं. त्याच वर्षी कॉटबसमध्येही तिनं कांस्यपदक मिळवलं होतं.
यानंतर सततच्या दुखापतीमुळे तिच्या कारकिर्दीवर परिणाम झाला. दुखापतीमुळे ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकली नाही. इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (आयटीए) घेतलेल्या डोप टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने तिच्यावर 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेच्या प्रतिबंधित यादीत असलेल्या हिझेनामाइनचं सेवन केल्याबद्दल ती दोषी आढळली होती. आयटीएने 11 ऑक्टोबर 2021 रोजी कर्माकरचे डोप नमुने घेतले होते. आयटीए ही आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनच्या (एफआयजी) डोपिंगविरोधी कार्यक्रमासाठी काम करणारी स्वतंत्र एजन्सी आहे. आता दीपाच्या बंदीचा कालावधी संपत आला आहे. दीपाने सांगितलं, की “मी चाचणीत सहभागी होणार असल्याचं निश्चित झालं आहे. मी गेल्या काही महिन्यांपासून आगरताळा येथे प्रशिक्षण घेत आहे. म्हणूनच मला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.” जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी दीपा ही पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे. ICC World Cup 2023 : क्रिकेट विश्वात मोठा उलटफेर, दोन वेळा चॅम्पियन ठरलेली टीम वर्ल्ड कपमधून बाहेर प्रशिक्षक नंदी यांना दीपावर विश्वास : दीपाचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी म्हणाले, “ती गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सराव करत आहे. सध्या तिचं लक्ष चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यावर आहे.” रिओ ऑलिम्पिकमध्ये 2016 चौथ्या स्थानावर राहिलेल्या दीपाव्यतिरिक्त, प्रणती नायक, प्रणती दास, प्रतिष्ठा सामंत यांसारख्या अव्वल खेळाडू या चाचणीच्या महिला विभागात सहभागी होतील. राकेश पात्रा, योगेश्वर सिंग ही पुरुष गटात सहभागी होणारी अव्वल नावं आहेत. रविवारी 2 जुलै जारी केलेल्या पत्रात जीएफआयने म्हटलं आहे, की “वैयक्तिक श्रेणीतल्या चांगल्या मूल्यांकनासाठी खेळाडूंना दोन टप्प्यांत संधी दिल्या जातील.”