लंडन, 1 एप्रिल : आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनचं (IPL 2021) काऊंटडाऊन सुरु झालं आहे. सर्वच टीमचे खेळाडू आता त्यांच्या आयपीएल टीममध्ये दाखल होत आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील वन-डे मालिकेपूर्वी जोफ्रा आर्चर (Jofra Archer) इंग्लंडमध्ये परतला होता. आर्चरच्या हाताचं काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन झालं आहे. त्यामुळे आर्चर यंदा आयपीएल खेळू शकणार नाही, अशी शक्यता होती. आर्चरचा सहभाग अनिश्चित असल्यानं राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) टीममध्ये काळजीचं वातावरण होते.आता ही काळजी दूर झाली आहे. जोफ्रा आर्चर सुरुवातीच्या काही मॅचनंतर आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. ‘ईएसपीएस क्रिकइन्फो’ ने दिलेल्या वृत्तानुसार आर्चर पहिल्या चार मॅच खेळणार नाही. त्यानंतर तो निवडीसाठी उपलब्ध असेल. आयपीएल स्पर्धेची सुरुवात 9 एप्रिल रोजी होणार असून राजस्थान रॉयल्स पहिली मॅच 12 एप्रिल रोजी पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे. ECB कडे लक्ष जोफ्रा आर्चर भारतामध्ये रवाना कधी होणार याची तारीख इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) जाहीर करणार आहे. त्यामुळे ECB च्या घोषणेकडं राजस्थान रॉयल्सचं लक्ष लागलं आहे. आर्चरच्या हाताच्या बोटाचं काही दिवसांपूर्वी ऑपरेशन झालं आहे. त्यामुळे तो दोन आठवडे आराम करणार आहे. त्यानंतर डॉक्टर त्याची तपासणी करणार असून या तपासणीनंतरच तो कधी खेळू शकेल हे स्पष्ट होईल. आर्चरचा हाताचा कोपराही काही दिवसांपूर्वी दुखावला होता. त्यावर देखील सध्या उपचार सुरु आहेत. भारत दौऱ्यापूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात त्याला याचा त्रास झाला होता. त्यामुळे तो श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत खेळला नव्हता. ( वाचा : KKR चा ‘हा’ खेळाडू ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन व्हावा, मायकल क्लार्कनं व्यक्त केली इच्छा ) भारताविरुद्धच्या सर्व मालिकांमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. पण आर्चरनं त्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. विशेषत: त्याने टी20 मालिकेत 7.75 च्या इकॉनॉमी रेटनं 7 विकेट्स घेतल्या होत्या. मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्येही आर्चरनं जोरदार कामगिरी केली होती. त्याने राजस्थान रॉयल्सकडून सर्वात जास्त विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आयपीएल 2021 मध्ये आर्चर जितक्या लवकर खेळेल तितकं राजस्थानसाठी चांगलं असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.