मुंबई, 5 जून : 2013 साली भारतीय क्रिकेटला पुन्हा एकदा फिक्सिंगचं ग्रहण लागलं. राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) खेळाडू एस.श्रीसंत (S Sreesanth), अजित चंडीला (Ajit Chandila) आणि अंकित चव्हाण (Ankeet Chavan) यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. यानंतर या तिघांवर बीसीसीआयने (BCCI) बंदी घातली. आता अंकित चव्हाण याने बीसीसीआयकडे पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी आयुष्यभराची बंदी 7 वर्ष केल्यामुळे आता मला क्रिकेट खेळायला परवानगी मिळावी, अशी मागणी अंकित चव्हाणने केली आहे. अंकित चव्हाण हा आता बीसीसीआयकडून अधिकृत संदेश मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.
'बीसीसीआयच्या लोकपालनी माझी आयुष्यभराची बंदी आता 7 वर्ष केली. याबाबतची सुनावणी 19 एप्रिलला झाली, तसंच लोकपाल यांनी याबाबतचे आदेश 3 मे रोजी दिले. मागचा एक महिना मी बीसीसीआयला पत्र लिहित आहे, पण त्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पत्र लिहिलं. माझी बंदी 7 वर्ष करण्यात आली आहे, असं अधिकृत पत्र मला बीसीसीआयकडून हवं आहे. मी खेळण्यासाठी पात्र असल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवायचं आहे. एमसीएलाही मी बीसीसीआयला याबाबत सांगण्याची विनंती केली आहे,' असं अंकित चव्हाण टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला.
'माझं आणि श्रीसंतचं प्रकरण सारखंच आहे, त्याची बंदीही 7 वर्ष करण्यात आली. पण त्याची बंदी पूर्ण व्हायच्या आधी बीसीसीआयच्या लोकपालचे आदेश आले, माझ्याबाबतीत बंदीचा कालावधी संपल्यानंतर लोकपालने आदेश दिले. माझा बंदीला 7 वर्षांचा कालावधी 20 सप्टेंबर 2020 लाच संपला आहे,' असं 35 वर्षांचा अंकित चव्हाण म्हणाला.
अंकित चव्हाण याने एमसीएला पत्र लिहिलं असलं तरी त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं जात आहे. हे प्रकरण बीसीसीआयशी संबंधित आहे, त्यामुळे याबाबत आम्ही कसा निर्णय घेऊ शकतो? असं एमसीएच्या सूत्रांनी सांगितलं. मागच्या वर्षीही अंकित चव्हाणने याबाबत एमसीएला पत्र पाठवलं होतं, पण तेव्हादेखील त्याला कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ipl, Spot fixing