मुंबई, 19 जुलै : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागच्या बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहे. मागच्या तीन वर्षांपासून एकही शतक न केलेला कोहली आता तर मोठा स्कोअर करण्यातही अपयशी ठरत आहे. करियरच्या सगळ्यात खराब काळातून जात असलेल्या कोहलीला काही जण विश्रांती घ्यायची विनंती करत आहेत, तर काहींना त्याच्या टेकनिकमध्ये त्रुटी दिसत आहेत. भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी याबाबत आपलं मत मांडलं आहे. मला विराट कोहलीसोबत 20 मिनिटांचा वेळ मिळाला तर मी त्याला मदत करू शकतो, असं गावसकर म्हणाले आहेत. ‘जर मला त्याच्यासोबत 20 मिनिटं मिळाली, तर मी नेमकं काय करायला पाहिजे, हे मी त्याला सांगू शकतो. मी त्याला मदत करायला तयार आहे, यामुळे त्याचा नक्कीच फायदा होईल. ऑफ स्टम्प लाईनमुळे त्याला जी अडचण येत आहे, त्यावर मी त्याच्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली आहे. गावसकर इंडिया टुडेसोबत बोलत होते. ‘मी ओपनिंग बॅट्समन होतो. ऑफ स्टम्प लाईनने मलाही खूप त्रास दिला. काही गोष्टी आहेत, ज्यामुळे विराटला मदत होऊ शकते. त्यामुळे विराटने फक्त 20 मिनिटं दिली तर मी त्याच्याशी बोलू शकतो,’ अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली. कोहलीला प्रत्येक बॉल खेळायचा विराटच्या बॅटमधून रन येत नाहीत, त्यामुळे तो प्रत्येक बॉल खेळायला जात आहे. फॉर्ममध्ये नसल्यामुळे विराटला प्रत्येक बॉलवर रन करायचे आहेत, पण तो इकडेच चुकत आहे, असं गावसकर म्हणाले. विराट कोहलीवर वारंवार टीका होत असताना गावसकरांनी मात्र त्याचा बचाव केला आहे. विराटचं रेकॉर्ड पाहा, त्याने देशासाठी 70 शतकं केली आहेत, त्यामुळे तो जर काही सामन्यांमध्ये अपयशी ठरलातर त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, असं वक्तव्य गावसकरांनी केलं. विराट कोहली इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरला. दोन टी-20 मध्ये त्याने फक्त 12 रन केले, तर दोन वनडे आणि एका टेस्टमध्येही त्याला मोठा स्कोअर करता आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.