मुंबई, 28 जून : इंग्लंडला पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या इयन मॉर्गनने (Eoin Morgan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2006 साली मॉर्गनने आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर तो इंग्लंडकडून खेळायला लागला. 35 वर्षांचा मॉर्गन इंग्लंडचा सर्वाधिक रन करणारा आणि सगळ्यात यशस्वी कर्णधार होता. इंग्लंडकडून खेळताना मॉर्गनने 225 वनडेमध्ये 13 शतकांच्या मदतीने 6,957 रन केल्या. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने 14 शतकांसह 7,701 रन केल्या.
इयन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने 126 सामन्यांपैकी 76 मॅच जिंकल्या. 2019 साली घरच्या मैदानात लॉर्ड्सवर वनडे वर्ल्ड कप जिंकणं हा मॉर्गनच्या करियरमधला सर्वोच्च क्षण होता.
वनडेशिवाय टी-20 क्रिकेटमध्येही मॉर्गन यशस्वी ठरला. 115 सामन्यांमध्ये 14 अर्धशतकं आणि 136.18 च्या स्ट्राईक रेटने त्याने 2,458 रन केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्येही मॉर्गन यशस्वी कर्णधार आहे. मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने 72 पैकी 42 टी-20 मॅच जिंकल्या आहेत.
काहीच दिवसांपूर्वी इंग्लंडने जो रूटऐवजी बेन स्टोक्स याची टेस्ट टीमचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. आता मॉर्गनच्या निवृत्तीनंतर वनडे आणि टी-20 साठीही स्टोक्सकडेच कॅप्टन्सी दिली जाते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.