ऑकलंड, 10 नोव्हेंबर : क्रिकेटच्या इतिहासात सर्वात थरारक असा सामना बघायला मिळाला तो यंदा झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये तोसुद्धा अतिम सामना. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी प्रत्येक चेंडू श्वास रोखून धरायला लावणारा होता. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. टी20 मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना पुन्हा एकदा टाय झाला आणि विजेत्याचा निर्णय सुपरओव्हरमध्ये ठरला. पुन्हा एकदा इंग्लंडने बाजी मारत सामन्यासह मालिका 3-2 ने जिंकली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्याने 11 षटकांचा सामना खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून इंग्लंडने न्यूझीलंडला फलंदाजीला पाचारण केलं. पावसामुळे वेगवान गोलंदाजांना फायदा होईल असं इंग्लंडला वाटलं पण उलट झालं. न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि कुलीन मुन्रो यांनी केलेल्या फटकेबाजीने इंग्लंडच्या कर्णधाराचे मनसुबे उधळून लावले. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलने 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर लगेच तो बाद झाला. गुप्टिलने त्याच्या खेळीत 5 षटकार आणि तीन चौकार मारले. तर मुन्रोने 24 चेंडूत 4 षटकार 2 चौकारांच्या सहाय्याने 46 धावा केल्या. या दोघांशिवाय टिम सीफर्टने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने 16 चेंडूत 5 षटाकर आणि एका चौकारासह 39 धावा केल्या. न्यूझीलंड़ने 11 षटकात 146 धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेल्या 146 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर बेंटन 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टोनं 18 चेंडूत 47 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन 17, सॅम करन 24 आणि टॉम करन यांनी 12 धावा केल्या. अखेरच्या षटकांत हा सामना रोमहर्षक झाला. सामन्यात एकूण 29 षटकार मारले गेले. यातील इंग्लंडने 15 तर न्यूझीलंडने 14 षटकार मारले.
You’re kidding right! Another SUPER OVER vs @englandcricket 🏏 Southee to bowl it, Bairstow + Morgan to face up 🤜🏽🤛🏽#NZvENG #cricketnation pic.twitter.com/cHgxSYIHFf
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 10, 2019
अखेरच्या 2 षटकात इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी 26 धावा पाहिजे होत्या. त्यांच्याकडे 4 विकेट शिल्लक होत्या. अखेरच्या षटकात त्यांना 16 धावा पाहिजे होत्या. पहिल्या चेंडूवर दोन आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव निगाली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर टॉम करन बाद झाला. यावेळी इंग्लंडला विजयासाठी 3 चेंडूत 13 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर जॉर्डनने षटकार मारला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर दोन धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती. पण चौकार गेला आणि सामना टाय झाला. सामना टाय झाल्यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली. यामध्ये इंग्लंडने 17 धावा केल्या. यामध्ये टिम साउदीने टाकलेल्या षटकात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने एक आणि जॉनी बेअरस्टोने एक षटकार मारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्टिल आणि टिम सीफर्ट फलंदाजीला उतरले. पहिल्या दोन चेंडूत त्यांच्या 7 धावा झाल्या. पुढच्या चार चेंडूत फक्त 10 धावा हव्या होत्या. मात्र, इंग्लंडने त्यांना संधी दिली नाही आणि न्यूझीलंडला फक्त एकच धाव काढता आली. इंग्लंडने हा सामना 9 धावांनी जिंकला. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेत शेवटच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकून बरोबरी साधली होती. पहिल्या सामन्यात इंग्लंडने 7 गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 21 धावांनी तर तिसऱ्या सामन्यात 14 धावांनी विजय मिळवला. चौथ्या सामन्यात इंग्लंडने मालिकेत पुनरागमन करत न्यूझीलंडला 76 धावांनी लोळवलं होतं. अखेरच्या निर्णायक सामन्यात पुन्हा इंग्लंडनेच बाजी मारली.

)







