मुंबई, 3 जून : इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) आपल्या पदार्पणाच्या टेस्टमध्येच वादात सापडला आहे. एकाच दिवसापूर्वी रॉबिन्सनने लॉर्ड्सवरून (Lords Cricket Ground) टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण त्याला आपल्या 8 वर्ष जुन्या वर्णद्वेषी आणि लिंगभेदी ट्वीटवरून माफी मागावी लागली आहे. ही ट्वीट एप्रिल 2012 आणि जून 2013 साली करण्यात आली होती, त्यावेळी रॉबिन्सनचं वय 18 वर्ष होतं. रॉबिन्सनने त्याच्या ट्वीटमध्ये एका धर्माच्या लोकांना दहशतवादाशी जोडले गेल्याचं दाखवण्यासाठी काही शब्दांचा वापर केला होता. एवढच नाही, तर त्याने आशियाई महिला आणि लोकांबाबतही अपमानकारक टिप्पणी केली होती. त्याच्या या ट्वीटवर आता लोक नाराजी व्यक्त करत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या (England vs New Zealand) लॉर्ड्स टेस्टचा पहिला दिवस संपल्यानंतर रॉबिन्सनने लगेचच या प्रकरणी माफी मागितली. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या दिवशी मी 8 वर्षांपूर्वी केलेल्या वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्वीटबाबत मला लाज वाटत आहे. मी वर्णभेदी किंवा लिंगभेदी नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. 8 वर्षांपूर्वी केलेल्या या कृतीचा मला पसतावा झाला आहे. तसंच यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो. मी कोणताही विचार न करता, बेजबाबदारपणे वर्तणूक केली. या गोष्टी समजण्याइतकं माझं वयही तेव्हा नव्हतं. तरीही मी माफी मागतो, असं रॉबिन्सन म्हणाला. आज माझ्या टेस्ट पदार्पणाविषयी बोललं गेलं पाहिजे होतं. माझी कामगिरी चर्चेचा विषय असली पाहिजे होती, पण भूतकाळात मी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याने यावर पाणी टाकलं. आयुष्यात बदल घडवण्यासाठी मी गेल्या काही वर्षांमध्ये खूप मेहनत घेतली. यामध्ये माझी काऊंटी टीम ससेक्स आणि इंग्लंडच्या टीमने खूप पाठिंबा दिला. एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून मला जे शिक्षण आणि समज गरजेची होती, ती मला मिळाली, अशी प्रतिक्रिया रॉबिन्सनने दिली.
💬"I would like to unreservedly apologise to anyone I have offended, my teammates and the game as a whole."💬
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 2, 2021
ECB will investigate Ollie Robinson's historical racist and sexist tweets under its disciplinary process, as England debutant issues apology.
रॉबिन्सनने माफी मागितली असली, तरी इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्याच्यावर अनुशासनात्मक कारवाई करू शकते. रॉबिन्सनने केलेल्या ट्वीटमुळे एखादी महिला किंवा धर्माच्या व्यक्तीची क्रिकेट आणि खेळाडूंबाबत वेगळी प्रतिमा तयार होऊ शकते. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्ही खपवून घेणार नाही, तसंच अशाप्रकारच्या वागणुकीविरोधात आमच्याकडे नियम आहेत, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले. ओली रॉबिन्सनने न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी 16 ओव्हरमध्ये 50 रन देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. रॉबिन्सनने 2015 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून 63 सामन्यांमध्ये त्याने 279 विकेट घेतल्या. 14 लिस्ट ए मॅचमध्ये त्याने 14 विकेटही मिळवल्या आहेत.

)







