• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • आणखी एक क्रिकेटपटू देश सोडणार, वर्ल्ड कपसाठी या देशाकडून खेळणार!

आणखी एक क्रिकेटपटू देश सोडणार, वर्ल्ड कपसाठी या देशाकडून खेळणार!

इंग्लंडचा क्रिकेटपटू जेड डर्नबॅक (Jade Dernbach) याची पुढच्या महिन्यात आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) युरोप क्वालिफायरसाठी इटलीच्या टीममध्ये (Italy Cricket Team) निवड झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर : दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्यासाठी आपला देश सोडण्याचे प्रकार सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वारंवार घडत आहेत. मागच्या काही काळात इंग्लंडच्या टीमला याचा चांगला फायदा झाला. तर भारतातूनही काही क्रिकेटपटू अमेरिकेमध्ये खेळायला गेले. आता इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू थेट इटलीमध्येच खेळायला जाणार आहे. इंग्लंडचा क्रिकेटपटू जेड डर्नबॅक (Jade Dernbach) याची पुढच्या महिन्यात आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) युरोप क्वालिफायरसाठी इटलीच्या टीममध्ये (Italy Cricket Team) निवड झाली आहे. जेड डर्नबॅक 2011 ते 2014 मध्ये इंग्लंडकडून खेळला होता. यानंतर मात्र त्याला इंग्लंडकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. डर्नबॅक काहीच दिवसांपूर्वी झालेल्या द हंड्रेड या स्पर्धेत लंडन स्पिरीटकडून खेळला होता. डर्नबॅकला मागच्या काही वर्षांपासून सरेकडून मर्यादित ओव्हरच्या स्पर्धांमध्येही खेळण्याची फार संधी मिळाली नाही, त्यामुळे त्याने या मोसमानंतर सरेलाही सोडण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करण्यासाठी तो इटलीला जाणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार डर्नबॅकला इटलीकडून खेळण्यासाठी नॉर्थम्पटनशरकडून खेळलेल्या गेरेथ बर्गने तयार केलं. बर्ग इटलीचा कर्णधार आणि कोच आहे. डर्नबॅकने इंग्लंडकडून 34 टी-20 मध्ये 39 विकेट घेतल्या. तर 24 वनडेमध्ये त्याला 31 विकेट मिळाल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 113 मॅच खेळून 311 विकेट आणि लिस्ट एमध्ये 144 मॅच खेळून 228 विकेट घेतल्या. 165 टी-20 मध्ये 178 विकेट घेण्यात त्याला यश आलं. डर्नबॅकने 28 जून 2011 साली श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केलं होतं, याच्या तीन दिवस आधी तो पहिली टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. 2011 वर्ल्ड कपमध्ये डर्नबॅक याची अजमल शहजादऐवजी बदली खेळाडू म्हणून निवड झाली होती. डर्नबॅकचा जन्म दक्षिण आफ्रिकेतला आहे, पण 14 व्या वर्षीच तो इंग्लंडमध्ये आला. ओवेस शाह इटलीचा कोच डर्नबॅकशिवाय ऑस्ट्रेलियात जन्मलेला ग्रॅण्ट स्टीवर्टही इटलीकडून खेळणार आहे. स्टीवर्ट काऊंटी क्रिकेटमध्ये केंटकडून खेळत होता. तर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ओवेस शाह इटलीचा असिस्टंट कोच असेल. इटलीच्या टीमला त्यांच्या रँकिंगमुळे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळालं आहे. या क्वालिफायरमधून जिंकलेल्या टीमना 2022 वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: