मॅनचेस्टर, 8 ऑगस्ट : पाकिस्तानविरोधातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत इंग्लंडने विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने विजयासाठी इंग्लंडसमोर 277 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करत इंग्लंडने पाकिस्तानवर 3 विकेट राखून विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने पहिल्या डावात 326 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी कमाल करत इंग्लंडला अवघ्या 219 धावांवर रोखलं. मात्र दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली आणि पाकचा दुसरा डाव फक्त 169 धावांवर आटोपला. अखेरच्या डावात पाकिस्तानने दिलेलं 277 धावांचं आव्हान पूर्ण करत इंग्लंड विजयाचा दुष्काळ दूर केला. तब्बल 2 वर्षानंतर इंग्लंडने कसोटी सामन्यात पाकवर विजय मिळवला आहे. वोक्स आणि बलटर ठरले इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना काही काळासाठी इंग्लंच्या संघाचीही दमछाक झाली होती. मात्र अष्टपैलू खेळाडू क्रिस वोक्स आणि जॉस बटलर यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करण्यात यश मिळवलं. दुसऱ्या डावात वोक्सने 80 तर बटलरने 75 धावा फटकावल्या. पाकिस्तानकडून यासिर शाह याने सर्वाधिक 4 विकेट मिळवल्या, तर शाहीन अफरीदी, मोहम्मद अब्बास आणि नसीम शाह याला प्रत्येकी एक फलंदाज बाद करण्यात यश मिळालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.