मुंबई, 17 जून : इंग्लंड आणि नेदरलँड (England vs Netherlands) यांच्यातल्या तीन वनडे मॅचच्या सीरिजची पहिली मॅच एम्स्टेल्विनमध्ये खेळवली जात आहे. इंग्लंडची टीम जवळपास एका वर्षानंतर वनडे मॅच खेळत आहे. याआधी त्यांनी मागची वनडे सीरिज पाकिस्तानविरुद्ध खेळली होती. या सामन्यात नेदरलँडच्या कर्णधाराने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का लागला. जेसन रॉय (Jason Roy) 1 रनवर आऊट झाला. जेसन रॉयची विकेट त्याचा भाऊ शेन स्नेटरने (Shane Snater) घेतली. स्नेटर मॅचची स्वत:ची पहिलीच ओव्हर टाकत होता. पहिल्या दोन बॉलवर रॉयला एकही रन काढता आली नाही, यानंतर तिसऱ्या बॉलवर तो बोल्ड झाला. स्नेटरने टाकलेला हा बॉल फूल लेंथ होता. बॉल थोडा स्विंग होऊन आत आला, ज्याचा फटका रॉयला बसला. रॉयच्या बॅटला बॉल लागून स्टम्पच्या दिशेने गेला. 7 बॉलमध्येच रॉयची इनिंग संपली. जेसन आणि शेन यांच्या आई एकमेकींच्या बहिणी आहेत. या दोघी झिम्बाब्वेमधून येतात. या नात्याने जेसन आणि शेन भाऊ आहेत.
Early wicket for the hosts as Jason Roy is dismissed by his cousin 😬
— England Cricket (@englandcricket) June 17, 2022
Watch Live: https://t.co/oHQ2mCZ6bu
🇳🇱 #NEDvENG 🏴 pic.twitter.com/879XDhx7r9
इंग्लंडचा विक्रमी स्कोअर जेसन रॉयची विकेट लवकर गेल्यानंतरही इंग्लंडने वनडे क्रिकेटमधल्या सर्वाधिक स्कोअरची नोंद केली आहे. इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 498 रन केले, यात त्यांनी 26 सिक्स आणि 36 फोर मारल्या. आयपीएल 2022 मध्ये धमाका करणाऱ्या जॉस बटलरने (Jos Buttler) 70 बॉलमध्ये नाबाद 162 रनची खेळी केली, यामध्ये 7 फोर आणि 14 सिक्सचा समावेश होता. याशिवाय फिलिप सॉल्टने (Philip Salt) 93 बॉलमध्ये 122 आणि डेव्हिड मलानने 109 बॉलमध्ये 125 रनची खेळी केली. सॉल्टने 14 फोर आणि 3 सिक्स तर मलानने (David Malan) 9 फोर आणि 3 सिक्स मारल्या. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) 300 च्या स्ट्राईक रेटने 22 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले, यात त्याने 6 फोर आणि 6 सिक्स ठोकले.