मुंबई, 11 मार्च : सध्या भारतात सुरु असलेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. अशातच आज गुजरात जाएंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. यात दिल्ली संघाने सुरुवातीपासूनच सामन्यावर जबरदस्त पकड मिळवून दिल्लीच्या संघाला अक्षरश लोळवत विजय मिळवला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघातील लेडी सेहवाग म्हणून ओळखली जाणारी शफाली वर्मा हिने जबरदस्त कामगिरी फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या सुरुवातीला गुजरात जाएंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु दिल्ली संघाने गुजरातच्या एकाही फलंदाजाला फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करून 20 षटकात 9 विकेट्स घेऊन प्रतिस्पर्धी संघाला 105 धावांवर रोखलं. दिल्ली कॅपिटलमधील गोलंदाज मारिझान कॅप हिने गुजरात संघाच्या 5 विकेट्स घेतल्या, शिखा पांडेने 3 विकेट्स घेतल्या तर राधा यादव हिने 1 विकेट घेतली.
गुजरात संघाने विजयासाठी दिलेलं सोपं आव्हान पूर्ण करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स कडून स्टार फलंदाज शफाली वर्मा आणि मेग लॅनिंग मैदानात उतरल्या. लेडी सेहेवागने सुरुवातीपासूनच आपल्या फलंदाजीचा झंजावात सुरु ठेवला. तिने केवळ 19 चेंडूत अर्धशतक ठोकले, तसेच 28 चेंडूत 76 धावा करत ती नाबाद राहिली. त्यात तिने 10 चौकार आणि 5 षटकार ठोकले, तर यावेळी शफालीचा स्ट्राईक रेट 271.43 इतका होता. शफालीने WPL 2023 च्या हंगामातील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. तर मेग लॅनिंगने देखील 15 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. यासह दिल्ली संघाने गुजरातचे 106 धावांचे आव्हान अवघ्या 7.1 ओव्हरमध्ये पार केले.