मुंबई, 22 फेब्रुवारी : टीम इंडियाचा सलामीवीर पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) फॉर्म गेल्या काही दिवसांपासून हरपला होता. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) आणि भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो फार कमाल करू शकला नव्हता. या खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियामधून वगळण्यात आलं होतं. टीममधून वगळताच पृथ्वीनं फॉर्ममध्ये परत येण्याचे संकेत दिले आहेत.
विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेतील मुंबईच्या पहिल्याच मॅचमध्ये पृथ्वी शॉने शतक झळकावलं आहे. दिल्लीविरुद्ध झालेल्या लढतीत पृथ्वीनं 89 बॉलमध्ये 15 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 105 रन केले. त्याच्या शतकाच्या जोरावर मुंबईनं दिल्लीनं दिलेलं 212 रनचं आव्हान 32 व्या ओव्हरमध्ये आणि 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
पृथ्वी शॉ दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये पूर्ण रंगात होता. मुंबईनं पहिली विकेट झटपट गमावली. त्यानंतर त्यानं कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 82 रनची भागिदारी केली. अय्यर सहा फोर आणि एक सिक्सच्या मदतीनं 39 रन काढून आऊट झाला. अय्यर आऊट होताच पृथ्वीची सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सोबत जोडी जमली. टीम इंडियात नुकतीच निवड झालेल्या सूर्यकुमारनंही आक्रमक रन केले. पृथ्वी शॉ ने 83 बॉलमध्ये शतक झळकावलं. तर सूर्यकुमारनं 32 बॉलमध्येच सहा फोर आणि दोन सिक्सच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं.
सूर्यकुमार 50 रनवर आऊट झाल्यानंतर पृथ्वी शॉने शिवम दुबेच्या मदतीनं विजयाची औपचारिकता पूर्ण केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईनं विजयानं सुरुवात केली आहे. तर दिल्लीचा पहिल्याच मॅचमध्ये मोठा पराभव झाला आहे.
(वाचा : IND vs ENG : टीम इंडियात निवड होताच सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया... )
धवन शून्यावर आऊट
यापूर्वी पहिल्यांदा बॅटिंग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. दिल्लीचा अनुभवी बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhawan) शून्यावर आऊट झाला. धवनच नाही, तर हिंमत सिंगचा अपवाद वगळता दिल्लीच्या सर्व टॉप ऑर्डरनं निराशा केली. मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीची अवस्था 6 आऊट 32 झाली होती. त्यावेळी हिंमत सिंगनं जबरदस्त खेळ करत शतक झळकावलं. हिंमतच्या 106 रनच्या झुंजार खेळीमुळे दिल्लीला 50 ओव्हरमध्ये 7 आऊट 211 पर्यंत मजल मारता आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Delhi, Mumbai, Prithvi Shaw, Sports