शारजाह, 8 नोव्हेंबर: पाकिस्ताननं रविवारी झालेल्या मॅचमध्ये स्कॉटलंडचा पराभव करत स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) आणि अनुभवी शोएब मलिकनं (Shoaib Malik) यांच्या दमदार खेळामुळे पाकिस्ताननं 72 रननं विजय मिळवला. शोएबनं फक्त 18 बॉलमध्ये नाबाद 54 रन केले. त्याच्या आक्रमक खेळीमुळेच पाकिस्ताननं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 आऊट 189 रनपर्यंत मजल मारली.
7 बॉलमध्ये 5 सिक्स
शोएब मलिक बॅटींगला आला तेव्हा पाकिस्तानला झटपट रनची गरज होती. पहिल्या 11 बॉलमध्ये 19 रन काढणाऱ्या मलिकनं शेवटच्या ओव्हर्समध्ये गिअर बदलला. त्यानं शेवटच्या 7 बॉलमध्ये 6,1,6,6,4,6,6 रन काढले. याचाच अर्थ त्यानं शेवटच्या 7 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 फोरसह एकूण 35 रन काढले. शेवटच्या 7 बॉलमध्ये त्यानं 500 च्या स्ट्राईक रेटनं रन काढले.
शोएब मलिकची ही खेळी पाहण्यासाठी भारतीय टेनिस स्टार आणि शोएबची पत्नी सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि त्यांचा मुलगा इजहान स्टेडियममध्ये उपस्थित होते. सोशल मीडियावर या दोघांचा फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये सानिया शोएबच्या फटकेबाजीवर भलतीच खूश झाल्याचं दिसत आहे. तिनं टाळ्या वाजवत शोएबच्या खेळीचा आनंद लुटला.
Sania Mirza in the ground and Shoaib Malik performing like that, what a day 😍🇵🇰#PAKvsSCO pic.twitter.com/AnVBomxy95
— Syeda Trimzi (@TrimiziiiSyeda) November 7, 2021
शोएबचा नवा रेकॉर्ड
पाकिस्तानकडून टी20 मॅचमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड शोएबनं केला आहे. मलिकनं 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. त्यानं उमर मलिकचा 11 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. उमरनं 2010 साली 21 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले होते. या वर्ल्ड कपमध्ये शोएब मलिक आणि केएल राहुल यांनी प्रत्येकी 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक युवराज सिंहनं 12 बॉलमध्ये लगावलं आहे.
पाकिस्तान स्पर्धेत अपराजित
टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 मध्ये अपराजित राहिलेली पाकिस्तान ही एकमेव टीम ठरली आहे. त्यांनी सर्व पाच मॅच जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. आता सेमी फायनलच्या चारही टीम निश्चित झाल्या आहेत. पहिल्या ग्रुपमधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या ग्रुपमधून पाकिस्तान आणि न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता पहिली सेमी फायनल इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात 10 नोव्हेंबरला तर दुसरी सेमी फायनल पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात 11 नोव्हेंबरला होणार आहे. या दोन सेमी फायनलमधल्या विजेत्या टीम 14 नोव्हेंबरला फायनल खेळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan, Sania mirza, T20 world cup