नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: क्रिकेटमध्ये सध्या टी-20ची क्रेझ असली तरी मुळ क्रिकेट हे कसोटी क्रिकेटच मानले जाते. एखाद्या क्रिकेटपटूचा दर्जा कसा आहे हे ठरवण्यासाठी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये कशी कामगिरी केली आहे हे पाहिले जाते. हाच नियम संघांसाठी देखील लागू होतो. भारतीय संघा(Indian Cricket Team)चा विचार केल्यास 2019मध्ये टीम इंडियाने 100 टक्के यश मिळवले आहे. टीम इंडियाने या वर्षात जानेवारी महिन्यात सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. हा सामना ड्रॉ झाला. त्यानंतर मात्र भारताने फक्त विजय आणि विजय मिळवला आहे. भारतीय संघाने सिडनी कसोटीनंतर सलग 7 कसोटी सामन्यात विजय मिळवला. विशेष म्हणजे टीम इंडिया(Team India)ने गेल्या 4 कसोटी सामन्यात एक डाव आणि धावांनी विजय मिळवला आहे. हा देखील एक विश्वविक्रम आहे. अर्थात कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाने केलेली कमाल एवढ्या पुरतीच नाही. या वर्षात एकाही कसोटीत भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. कसोटी खेळणाऱ्या संघांपैकी भारतीय संघ असा एकमेव संघ आहे की ज्याचा पराभव झालेला नाही. भारतीय संघाने या वर्षातील अखेरच्या कसोटीत बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी पराभव केला होता. अशी होती भारतीय संघाची कसोटीमधील कामगिरी 1) सिडनी कसोटी- ऑस्ट्रेलिया(Australia)विरुद्ध 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2019 या दरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 7 बाद 622 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर संपुष्ठात आला. कुलदीप यादवने 5 विकेट घेतल्या. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सहा धावा केल्या. या सामन्यात भारताने वर्चस्व ठेवले पण कसोटी ड्रॉ झाली. पहिल्या डावात भारताकडून चेतेश्वर पुजारा(Cheteshwar Pujara)ने 193 तर ऋषभ पंत (Rishabh Pant)ने 159 धावांची खेळी केली होती. 2) नॉर्थ साऊंड- वेस्ट इंडिजविरुद्ध 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या सामन्यात भारताने 318 धावांनी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 297 धावा केल्या होत्या. बदल्यात वेस्ट इंडिजने 222 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने 343 धावांचा डोंगर उभा केला. पण वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात 100 धावाच करता आल्या. हा भारतीय संघाचा या वर्षातील पहिला विजय ठरला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)याने या सामन्यात 81 आणि 102 धावा केल्या होत्या. 3) किंग्सटन- वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या. या बदल्यात वेस्ट इंडिजला पहिल्या डावात केवळ 117 धावा करता आल्या. भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 168 धावा करून डाव घोषित केला. पहिल्या डावा प्रमाणे वेस्ट इंडिजचा दुसरा डाव देखील कोसळला. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात केवळ 210 धावा केल्या. भारताने या सामन्यात 257 धावांनी विजय मिळवत मालिका 2-0ने जिंकली. भारताकडून या सामन्यात हनुमा विहारी (Hanuma Vihari)याने 111 आणि नाबाद 53 धावा केल्या. या सामन्यात जसप्रीत बुमराह(Jasprit Bumrah)ने हॅट्रिकसह 6 विकेट घेतल्या होत्या. 4) विशाखापट्टणम- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजीकरत 7 बाद 502 धावा केल्या होत्या. आफ्रिकेनेही चोख उत्तर देत पहिल्या डावात 431 धावा केल्या. टीम इंडियाने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला. भारतीय संघाने गेलेल्या या शानदार कामगिरीमुळे आफ्रिकेवर दबाव वाढला त्यांना दुसर्या डावात 191 धावा करता आल्या. या सामन्यात रोहित शर्माने 176 आणि 126 अशी शतकी खेळी केली होती. 5) पुणे- आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी केली होती. पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने 601 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात विराटने नाबाद 254 धावा केल्या होत्या. फलंदाजांनी केलेल्या कामगिरीनंतर गोलंदाजांनी आफ्रिकेला पहिल्या डावात 275 आणि दुसऱ्या डावात 189वर रोखले आणि संघाला एक डाव 137 धावांनी विजय मिळवून दिला. 6) रांची- आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 9 बाद 497 धावा केल्या होत्या. या सामन्यात रोहित शर्माने 212 धावांची खेळी केली होती. या बदल्यात आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांत संपुष्ठात आला आणि त्यांचा दुसरा डाव 133 धावात आटोपला. 7) इंदूर- बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून इंदूर येथे सुरु झाला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा डाव 150 धावात संपुष्ठात आला. उत्तरा दाखल भारताने 493 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी कमाल करत बांगलादेशचा दुसरा डाव 106 धावात संपुष्ठात आणला. या सामन्यात मयांक अग्रवाल याने 243 धावांची खेळी केली. तर मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या. 8) कोलकाता- 22 नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्स(Eden Gardens) मैदानावर सुरु झालेल्या डे-नाईट सामन्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाला सुरुवात झाली. केवळ भारतीय संघच नाही तर बांगलादेश संघाचा देखील हा पहिला डे-नाईट सामना होता. बांगलदेशने प्रथम फलंदाजीकरत 106 धावा केल्या. भारताने पहिल्या डावात 9 बाद 347 धावा केल्या आणि डाव घोषित केला. बांगलादेशने दुसऱ्या डावात 195 धावाच केल्या. या सामन्यात भारताने एक डाव 46 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा विजय विश्वविक्रमी ठरला कारण टीम इंडियाने सलग चार सामन्यात एक डावाने विजय मिळवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी आतापर्यंत कोणत्याही संघाने केलेली नाही. भारताचे कसोटीतील टॉप फलंदाज >मयांक अग्रवाल- 597 धावा, सरासरी 99.50 >रोहित शर्मा- 556 धावा, सरासरी 92.66 > विराट कहोली- 453 धावा, सरासरी 113.25 >अजिंक्य रहाणे- 353 धावा, सरासरी 70.60 >रवींद्र जडेजा- 284 धावा, सरासरी 71.00 भारताचे कसोटीतील टॉप गोलंदाज >उमेश यादव- 4 सामन्यात 23 विकेट > मोहम्मद शमी- 5 सामन्यात 22 विकेट >आर.अश्विन- 5 सामन्यात 20 विकेट >इशांत शर्मा- 4 सामन्यात 14 विकेट >रवींद्र जडेजा- 5 सामन्यात 13 विकेट पुढचे आव्हान न्यूझीलंड भारतीय संघा आता त्यांचा पुढील कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध फेब्रुवारी 2020मध्ये खेळणार आहे. भारतीय संघ जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते पाच टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 21 फेब्रुवारीपासून वेलिंग्टन येथे होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 29 फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







