मुंबई, 27 जानेवारी : वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. यामध्ये रवी बिष्णोई आणि दीपक हुडा यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. आगामी काळातील टी20 आणि वन-डे वर्ल्ड कपचा विचार करत नवी टीम तयार करण्यावर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा भर आहे. त्याचे संकेत या टीममधून मिळाले आहेत.
टी20 टीममध्ये युजवेंद्र चहल हा एक लेग स्पिनर आहे. यापूर्वी 2021 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये राहुल चहरचा समावेश करण्यात आला होता. त्याला यंदा वगळण्यात आलंय,. चहरची जागा रवी बिष्णोईनं घेतली आहे. 21 वर्षांच्या बिष्णोईनं 42 टी20 मॅचमध्ये 49 विकेट्स घेतल्या आहेत. (AFP)
दीपक हुडाची वन-डे टीममध्ये निवड करण्यात आली आहे. हुडानं गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएल तसंच देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. हुडानं 74 लिस्ट A मॅचमध्ये 39 च्या सरासरीनं 2257 रन काढले असून त्यामध्ये 4 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. हुडा त्याचबरोबर एक उपयुक्त ऑफ स्पिनर तसेच चपळ फिल्डर देखील आहे.
ऑफ स्पिनर म्हणून टीम इंडियाची वॉशिंग्टन सुंदर ही पहिली पसंती असेल. 22 वर्षांच्या सुंदरनं आजवर 31 टी20 आणि 4 टेस्ट खेळल्या आहेत. तसेच तो दमदार बॅटींग देखील करतो. सुंदरकडे पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करण्याचा अनुभव असून त्याचा अश्विनच्या जागी समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियानं या मालिकेत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली आहे. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मोहम्मद सिराज आणि आवेश खान फास्ट बॉलिंगची धुरा सांभाळतील. शार्दूल ठाकूर आणि दीपक चहर हे ऑल राऊंडर म्हणून टीममध्ये आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षल पटेलचा टीममध्ये समावेश आहे. (AFP)
रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीमध्ये अक्षर पटेल टी20 मालिकेत खेळणार हे नक्की आहे. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर देखील टीममध्ये आहेत. या तरूण खेळाडूंमध्ये जो चांगला खेळेल त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळेल. (PTI)