मुंबई, 29 नोव्हेंबर: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) यांच्यातील पहिली टेस्ट सध्या बांगलादेशमध्ये सुरू आहे. सोमवारी, या टेस्टच्या चौथ्या दिवशी मैदानात मोठी दुर्घटना घडली. या टेस्टमध्येच पदार्पण करणाऱ्या बांगलादेशचा बॅटर यासिर अली (Yasir Ali) याच्या डोक्याला पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदीचा (Shaheen Afridi) बॉल लागला. यासिरच्या हेल्मेटच्या मागील बाजूस हा बॉल लागला. आफ्रिदीनं टाकलेला बाऊन्सर खेळताना यासिरला हा बॉल लागला. त्यावेळी काही काळ मॅच थांबवण्यात आली होती.
बांगलादेशच्या फिजिओने तातडीनं मैदानात धाव घेत यासिरच्या दुखापतीची पाहणी केली. त्यानंतर यासिरनं पुन्हा बॅटींग सुरू केली. पण एक ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान यासिरनं पुन्हा एकदा त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यावेळी फिजिओनं पुन्हा एकदा त्याची तपासणी केली. या तपासणीनंतर यासिरनं मैदान सोडले. त्यानंतर त्याला स्थानिक हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आली. यासिर रिटायर हर्ट झाला तेव्हा तो 36 रन काढून खेळत होता.
टेस्टमधूनही बाहेर
या सर्व प्रकारानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार यासिर अली त्याच्या पदार्पणातील टेस्टमधून बाहेर गेला आहे. त्याची जागी कनकशन सब्सिट्यूट म्हणून नरुल हसन याचा समावेश करण्यात आला आहे. नियमानुसार हसनला फक्त बॅटींग करता येईल कारण यासिर अली हा बॅटर आहे. हसनला या टेस्टमध्ये विकेट किपिंग करता येणार नाही.
टेस्ट मॅचमध्ये बॉल लागल्यानं मॅच सोडावी लागलेला यासिर अली हा तिसरा बांगलादेशी क्रिकेटपटू आहे. यापूर्वी भारताविरुद्ध 2019 साली कोलकातामध्ये झालेल्या टेस्ट मॅचमध्ये लिटन दास आणि नईम हसन यांना डोक्याला बॉल लागल्यानं मॅच सोडावी लागली होती. त्याचबरोबर यावर्षीच्या वन-डे मॅचमध्ये मोहम्मद सैफुद्दीन जखमी झाल्यानं राखीव खेळाडूला मैदानात उतरावं लागलं होतं.
अश्विन बनला टीम इंडियाचा सर्वात यशस्वी ऑफ स्पिनर, हरभजनला मागे टाकत रचला इतिहास
यासिर अलीसाठी मात्र हा सर्व प्रकार दुर्दैवी ठरला. त्याची यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारातील बांगलादेशच्या टीममध्ये निवड झाली आहे. पण कधीही प्लेईंग 11 मध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. पाकिस्तान विरुद्धच्या टेस्टमध्ये त्याला अखेर ही संधी मिळाली, पण त्यामध्येही त्याला पूर्ण टेस्ट खेळता आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Cricket, Pakistan