हरारे, 9 मे: काही क्रिकेटपटूंना अगदी कमी वयात राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळते. तर काहींना त्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागते. पाकिस्तानचा फास्ट बॉलर ताबिश खान (Tabish Khan) याला वयाच्या 36 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. हरारेमध्ये सध्या पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (Pak vs ZIM) यांच्यात टेस्ट मॅच सुरु आहे. या टेस्टमध्ये ताबिशनं शुक्रवारी पदार्पण केलं.
पहिल्याच ओव्हरमध्ये रेकॉर्ड
हरारे टेस्टमध्ये पाकिस्तानची बॉलिंग सुरु झाल्यावर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) यानं दुसऱ्याच ओव्हरमध्ये ताबिशच्या हातामध्ये बॉल केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॉलिंग करण्याचं त्याचं स्वप्न शनिवारी अखेर पूर्ण झालं. त्यानंतर पहिली विकेट घेण्यासाठी त्याला फार काळ वाट पाहावी लागली नाही. पहिल्या ओव्हरचे पाच बॉल निर्धाव टाकल्यानंतर त्याला सहाव्या बॉलवर विकेट मिळाली.
ताबिशनं झिम्बाब्वेचा ओपनर तारिसाई मुसाकांदा याला LBW आऊट केलं. गेल्या 70 वर्षांमध्ये पदार्पणातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा रेकॉर्ड ताबिशनं केला. यापूर्वी 1951 साली दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर जीडब्ल्यू चब याने 40 व्या वर्षी इंग्लंड विरुद्ध पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली होती.
कोण आहे ताबिश खान?
ताबिश खान उजव्या हाताचा फास्ट बॉलर असून तो गेल्या 19 वर्षांपासून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत आहे. 2002 साली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पन करणाऱ्या ताबिशनं 598 विकेट्, घेतल्या आहेत. इतक्या वर्षांच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर पाकिस्तानच्या टीम मॅनेजमेंटनं त्याला पदार्पणाची संधी दिली आहे.
ताबिश खान पाकिस्तानकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तिसरा वयस्कर खेळाडू आहे. ताबिशनं 36 वर्ष 146 दिवसांचा असताना पदार्पण केलं आहे. पाकिस्तानकडून मिरान बख्शनं 1955 साली 47 वर्ष 284 दिवस वय होतं तेंव्हा पदार्पण केले होते. तर आमिर इलाहीनं 44 वर्ष 45 दिवस वय होतं तेंव्हा 1952 साली पदार्पण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.