मुंबई, 19 फेब्रुवारी : चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) आपल्या टीममध्ये घेणं हे यंदाच्या आयपीएल लिलावातील (IPL Auction) प्रमुख वैशिष्ट्य होते. पुजारा भारताच्या टेस्ट टीमचा मुख्य आधारस्तंभ आहे. मात्र तो ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटपासून बऱ्याच काळापासून दूर आहे. आयपीएलमध्ये पुजारा सात वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 साली शेवटचं खेळला होता. त्यानं काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. या लिलावात ‘टी-20 स्पेशालिस्ट’ समजल्या जाणाऱ्या अनेक खेळाडूंना कुणी ‘भाव’ दिला नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटचा स्पेशालिस्ट समजल्या जाणाऱ्या पुजारालाही संधी मिळणार नाही, असा अनेकांचा अंदाज होता. चेन्नईनं तो अंदाज चुकवत पुजाराला घेतलं. त्यावेळी सर्वांनीच टाळ्या वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं. चेतेश्वर पुजारानंही या निवडीनंतर चेन्नईच्या टीम मॅनेजमेंटचे आभार मानले आहेत.
Thank you for showing the faith 🙏
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) February 18, 2021
Look forward! https://t.co/t7QlT6SGW1
आपल्या खास शैलीतील ट्विटसाठी प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी खेळाडू वासिम जाफरनंही (Wasim Jaffer) या विषयावर एक मजेदार ट्विट केलं आहे. भारताच्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पुजारानं हेजलवुडला चांगलंच त्रस्त केलं होतं. त्यानं शास्त्रशुद्ध आणि संयमी बॅटींगमुळे हेजलवुडच्या संयमाची परीक्षा पाहिली होती. जाफरनं तो संदर्भ घेत त्याच्या ट्विटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि चेन्नई सुपर किंग्सचा फास्ट बॉलर जोश हेजलवुडचा (Josh Hazlewood) निराश झालेला फोटो टाकला आहे. त्याचबरोबर ‘तुम्हाला जेंव्हा आता नेटमध्ये पुजाराला बॉलिंग करावी लागेल तो क्षण’ असं ट्वीट केलं आहे.
That moment when you realise you will have to bowl again to @cheteshwar1 in the nets @ChennaiIPL #IPLAuction #IPL2021 pic.twitter.com/hT2zzqn3Jq
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 18, 2021
तीन वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी मागचं वर्ष निराशाजनक ठरलं होतं. त्यानं ते अपयश भरुन काढण्यसाठी यावेळी लिलावात पुजारासह मोईन अली आणि कृष्णप्पा गौतम या ऑल राऊंडर खेळाडूंची निवड केली आहे. गौतमचा टीममध्ये समावेश करण्यासाठी तर चेन्नईनं त्याच्या बेस प्राईजपेक्षा 46 पट जास्त किंमतीमध्ये खरेदी केलं आहे.

)







