चेन्नई, 4 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेच्या भोवती कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. आतापर्यंत तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. आयपीएलचे 10 सामने होणार असलेल्या मुंबई शहरातही गंभीर परिस्थिती आहे. कोरनाच्या वाढत्या रुग्णांचा फटका महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमला बसला आहे. चेन्नई सध्या जोश हेजलवूडच्या (Josh Hazlewood) बदली खेळाडूच्या शोधात आहे. दोन खेळाडूंनी कोरोनाच्या कारणामुळे चेन्नईकडून खेळण्यास नकार दिला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ नं दिलेल्या वृत्तानुसार बिली स्टॅनलेक (Billy Stanlake) आणि रेसी टोप्ले (Reece Topley) या दोन खेळाडूंनी कोरोनाचं कारण देत आयपीएल स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे. बिली स्टॅनलेक हा ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर आहे. तर रेसी टॉप्ले इंग्लंडचा फास्ट बॉलर असून नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात झालेल्या वन-डे मालिकेत तो खेळला होता. राष्ट्रीय टीममध्ये नियमित नसलेल्या दोघांनी सीएसकेकडून आयपीएल खेळण्याचा आकर्षक प्रस्तावाला नकार दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे या नकाराचं मुख्य कारण असण्याची शक्यता आहे. ‘या दोन खेळाडूंनी नकार दिल्यानंतरही आम्ही आशा सोडलेली नाही. लवकरच चांगल्या खेळाडूला करारबद्ध करु. मात्र सध्या खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी अडचण येत आहे,’ अशी माहिती सीएसकेच्या सूत्रांनी दिली आहे. हेजलवूडनं माघार का घेतली? हेजलवूडनं ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या वेबसाईटशी बोलताना या स्पर्धेतील माघारीचं कारण दिलं आहे. ‘बायो बबल आणि वेगवेगळ्या काळात क्वारंटाईन राहून 10 महिने उलटले आहेत. त्यामुळे मी सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. आम्हाला नंतरच्या कालावधीमध्येही बरंच क्रिकेट खेळायचं आहे,’ असे त्याने स्पष्ट केले. (वाचा: IPL 2021 भोवती वाढतोय कोरोना विळखा, आता RCB च्या बड्या खेळाडूला लागण ) ‘आम्हाला वेस्ट इंडिजचा मोठा दौरा करायचा आहे. त्यानंतर बांगलादेश दौरा, टी 20 वर्ल्ड कप आणि नंतर अॅशेस यामुळे पुढील 12 महिने अतिशय व्यस्त असतील. या काळात मला स्वत:ला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट राहयचं आहे. त्यामुळे मी आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे हेजलवूडने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







