शारजाह, 05 ऑक्टोबर : रोहित शर्मा (Rohit Sharma)च्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)ने रविवारी सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)वर 34 रननी विजय मिळवला. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने हैदराबादला विजयासाठी 209 रनचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. जॉनी बेयरस्टोच्या रुपात हैदराबादला 34 रनवर पहिला धक्का लागला. पहिली विकेट गेल्यानंतर मनिष पांडे आणि वॉर्नरने हैदराबादचा डाव सावरायला सुरुवात केली. पण मनिष पांडे आणि त्यानंतर लगेच केन विलियमसनची विकेट गेल्यामुळे हैदराबाद अडचणीत आली. पण डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या बाजूने किल्ला लढवत होता, त्यामुळे तो हैदराबादला विजयाजवळ घेऊन जाईल, असं वाटत होतं. पण इशान किशनने वॉर्नरचा जबरदस्त कॅच पकडून मॅचच पलटवली.
That was some brilliant work by Ishan kishan there!! #FlyingIshan #MI #SRHvsMI pic.twitter.com/RLgWqu2Ms1
— Vishal (@_vishaaaal) October 4, 2020
इशान किशनच्या या अफलातून कॅचनंतर हैदराबादची बॅटिंग गडगडली आणि त्यांना 174 रनपर्यंतच मजल मारता आली. वॉर्नर आऊट झाला तेव्हा हैदराबादच्या 142 रन झाल्या होत्या, तर 4.2 ओव्हरचा खेळ बाकी होता. जेम्स पॅटिनसनच्या बॉलिंगवर इशान किशनने उडी मारून अद्भूत कॅच पकडला. वॉर्नरची विकेट गेल्यानंतर हैदराबादला 32 रनच करता आल्या. 16व्या ओव्हरचा चौथा बॉल जेम्स पॅटिनसनने धीम्या गतीने टाकला, त्यामुळे वॉर्नरचा अंदाज चुकला आणि बॉल त्याच्या बॅटच्या किनाऱ्याला लागला. इशान किशननेही मग कोणतीही चूक न करता कॅच पकडला. वॉर्नरने 44 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्स मारून 60 रन केले होते.