ऍडलेड, 17 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या चार टेस्ट मॅचच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) ला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) साठी सीरिजची पहिली मॅच महत्त्वाची असणार आहे, कारण या मॅचनंतर विराट बाळाच्या जन्मासाठी भारतात परतणार आहे. या मॅचआधी विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांच्यात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांना प्रश्न विचारले.
या कार्यक्रमाची सुरुवात स्मिथने कोहलीला प्रश्न विचारून केली. स्मिथने विचारलेल्या या पहिल्या प्रश्नावर उत्तर देताना विराट कोहली भावुक झाला. स्मिथने विराटला त्याच्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या आठवणींवर प्रश्न विचारला. क्रिकेटशी जोडली गेलेली पहिली आठवण कोणती आहे? असा प्रश्न स्मिथने विराटला विचारला.
स्मिथच्या या प्रश्नाचं उत्तर देताना विराट भावुक झाला. वडील मला बॉल टाकायचे आणि मी हातात प्लास्टिक बॅट घेऊन शॉट मारायचो. ही माझी सगळ्यात सुंदर आठवण आहे, असं उत्तर विराटने दिलं. टीम इंडियाची जर्सी घालून देशासाठी क्रिकेटची मॅच जिंकावी, असं कायमच त्यांचं स्वप्न होतं. पण हे स्वप्न वडिलांच्या निधनानंतर सत्यात उतरल्याचं विराट म्हणाला.
विराट कोहली 18 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर विराटने संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रीत केलं. हा काळ माझ्यासाठी कठीण होता, त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त क्रिकेट होतं. बराच कालावधी मी फक्त खेळावर लक्ष केंद्रीत केलं. या काळात मला टीमबाहेर ठेवलं जाईल, असा विचारही मी कधी केला नाही, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.