सिडनी, 26 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बहुप्रतिक्षित सीरिजला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय टीम ऑस्ट्रलियामध्ये पोहोचली असून कसून तयारी देखील करत आहे. भारतीय खेळाडू मैदानावरच सराव करत नसून हॉटेलच्या रूममध्ये देखील सराव करताना दिसून येत आहेत. भारताच्या टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने नुकताच सोशल मीडियावर आपला एक व्हिडीओ शेयर केला. यामध्ये तो हॉटेलच्या रूममध्ये बॅटिंगचा सराव करत आहे. ‘मैदानावरील सराव बंद झाल्यानंतर देखील मला सरावाचा नवीन मार्ग सापडला आहे. मी माझ्या बॅटपासून जास्त काळ दूर राहू शकत नाही, माफ करा शेजारी’, असं अजिंक्य या पोस्टमध्ये म्हणाला आहे. अजिंक्यने हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल झाला. त्यावर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने तात्काळ प्रतिक्रिया देत अजिंक्य रहाणेचा पाय खेचला. त्याने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत ‘भावा मानले तुला, तू फॉर्ममध्ये आहे. कालच्याच सामन्यात तू 50 रन केलेल्या आहेत. या सरावाने काय फायदा होणार आहे ? रूमवर मुलीसोबत खेळ’.
शिखर धवनच्या या कमेंटची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. याआधी शिखर धवन याने भारतीय टीमच्या नवीन रेट्रो जर्सीचा फोटो अपलोड केला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारतीय टीम या नवीन जर्सीमध्ये खेळणार आहे. या नवीन जर्सीला क्रिकेट चाहत्यांनी देखील पसंत केलं. या जर्सीबरोबर भारतीय क्रिकेटच्या भावना जुळलेल्या आहेत. 1992 मध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमने ही जर्सी घातली होती. या नवीन जर्सीमध्ये स्पॉन्सर आणि इतर गोष्टी खूप मोठ्या अक्षरात टाकल्याने काहीजणांनी नाराजी व्यक्त केली आहे.
New jersey, renewed motivation. Ready to go. 🇮🇳 pic.twitter.com/gKG9gS78th
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 24, 2020
आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आलं. सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमधील पुलमन हॉटेलमध्ये भारतीय टीम क्वारंटाईन झाली आहे. या क्वारंटाईनमध्ये भारतीय खेळाडूंना सरावाची मुभा देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे, तीन टी-20 आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि कॅनबेरामधील मनुका ओव्हल मैदानावर हे सामने खेळवण्यात येणार आहेत. 17 डिसेंबरपासून सुरु होणारी पहिला डे-नाईट टेस्ट ऍडलेडमध्ये खेळवली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रलियामध्ये अजूनही काही निर्बंध आहेत. त्यामुळे गर्दीच्या नियंत्रणासाठी आयोजक तयारी करत आहेत. बॉक्सिंग डे टेस्ट सामन्याआधी सामने पाहायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंड समिती नियोजन करत आहे.