सिडनी, 23 नोव्हेंबर : टीम इंडिया (Team India) चा ऑस्ट्रेलिया दौरा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण त्याआधीच ऑस्ट्रेलियाकडून शाब्दिक खेळांना सुरुवात झाली आहे. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) विरुद्ध भारतीय बॉलरची बाऊन्सर टाकण्याची योजना योग्य राहणार नाही, असं मत ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक एन्ड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew Mcdonald) यांनी व्यक्त केलं आहे. न्यूझीलंडचा डावखुरा फास्ट बॉलर नील वॅगनरने 2019-20 साली टेस्ट सीरिजदरम्यान स्मिथला चारवेळा आऊट केलं होतं. त्या सीरिजमध्ये वॅगनरने वारंवार स्मिथच्या शरिरावर निशाणा साधून शॉर्ट पिच बॉलिंग केली होती. नील वॅगनरच्या या रणनीतीमध्ये स्मिथ फसला होता. असं असलं, तरी स्मिथच्या बॅटिंगमध्ये कोणताही कमकुवत दुवा नसल्याचं मॅकडोनाल्ड यांना वाटतं.
जोफ्रा आर्चरचा एक बॉल स्मिथच्या हेल्मेटला लागला होता, पण यानंतरही स्मिथने रन केले. वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्येही त्याच्याविरुद्ध हीच रणनीती वापरली गेली, पण तो रन करण्यात यशस्वी झाला, असं मॅकडोनाल्ड म्हणाले.
भारतीय बॉलरही स्मिथविरुद्ध ही रणनीती अवलंबू शकतात, पण जानेवारी महिन्यात झालेल्या तीन वनडे मॅचवेळीही स्मिथला भारतीय बॉलरनी अशीच बॉलिंग केली होती, तेव्हा त्याने 98 रन आणि 131 रनची खेळी केली होती, अशी प्रतिक्रिया मॅकडोनाल्ड यांनी दिली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून वनडे सीरिजला सुरूवात होईल, यानंतर टी-20 सीरिज खेळवली जाईल. तर 17 डिसेंबरपासून चार टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल.