मुंबई, 11 मार्च : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टेस्ट सीरिजमधील दुसरी आणि शेवटची टेस्ट शनिवारपासून बेंगळुरूमध्ये होत आहे. मोहालामध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया क्लीन स्वीप करण्याच्या उद्देशानं या टेस्टमध्ये उतरणार आहे. बेंगलुरूमध्ये डे-नाईट टेस्ट खेळली जाणार असून त्यासाठी खास गुलाबी बॉलचा (Pink Ball Test) वापर होणार आहे. ही टेस्ट सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेसाठी काळजीची बातमी आहे.
मोहाली टेस्टमध्ये अर्धशतक झळकावणारा श्रीलंकेचा बॅटर पथूम निसांका (Pathum Nissanka) अनफिट आहे. मीडिया रिपोर्टनुसार निसांकाच्या पाठदुखीचं जुनं दुखणं पुन्हा एकदा बळावलं आहे. त्यामुळे तो बेंगलुरू टेस्टमधून आऊट होऊ शकतो. मोहालीमध्ये श्रीलंकेच्या बहुतेक बॅटर्सचा टीम इंडियासमोर निभाव लागला नव्हता. निसांका मात्र पहिल्या इनिंगमध्ये अपवाद ठरला होता. त्याने तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला येत 133 बॉलमध्ये नाबाद 61 रन काढले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलचा विचार करता भारत आणि श्रीलंका या दोन्ही टीमसाठी ही टेस्ट महत्त्वाची आहे. निसांका या टेस्टमध्ये न खेळल्यास त्याच्या जागी कुशल मेंडिस किंवा दिनेश चंदीमल यांचा समावेश होऊ शकतो.
बँगलोरमध्ये होणारी डे-नाईट टेस्ट ही भारताची घरच्या मैदानातली तिसरी डे-नाईट टेस्ट असणार आहे. याआधी झालेल्या दोन्ही डे-नाईट टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय झाला होता, म्हणजेच घरच्या मैदानात टीम इंडियाचं विजयी रेकॉर्ड 100 टक्के आहे. याआधी भारताने डे-नाईट टेस्टमध्ये बांगलादेश आणि इंग्लंडचा पराभव केला होता.
श्रीलंकन टीमचं भारतातलं रेकॉर्ड निराशाजनक आहे. त्यांना अजूनपर्यंत भारतात एकही टेस्ट मॅच जिंकता आलेली नाही. भारत मात्र श्रीलंकेचं हे रेकॉर्ड अबाधित राहावं, यासाठी मैदानात उतरेल. दुसरी टेस्ट जिंकली तर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये एक स्थान वर येईल.
IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू सुरूवातीच्या मॅचमधून आऊट!
दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. जयंत यादवने (Jayant Yadav) पहिल्या टेस्टमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. पिंक बॉल जास्त स्विंग होतो, तसंच रात्रीच्या वेळी बॉल स्विंग व्हायचं प्रमाण आणखी वाढतं, त्यामुळे टीमकडे जयंत यादवऐवजी मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) खेळवण्याचीही संधी आहे. तसंच अक्षर पटेलचंही (Axar Patel) टीम इंडियात कमबॅक झालं आहे. याआधी इंग्लंडविरुद्ध झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये अक्षर पटेलने 6 आणि 5 अशा दोन इनिंगमध्ये 11 विकेट घेतल्या होत्या. अश्विन (R Ashwin) आणि जडेजा (Ravindra Jadeja) या दोन स्पिनर मात्र ही टेस्ट खेळतील हे निश्चित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.