मुंबई, 5 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) ही टेस्ट मालिका सध्या रंगतदार अवस्थेत आहे. चार टेस्टच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानं पहिली टेस्ट जिंकली. त्यानंतर दुसऱ्या टेस्टममध्ये टीम इंडियानं (Team India) कमबॅक केलं. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीमनं दुसरी टेस्ट आठ विकेट्सनं जिंकली. त्यामुळे सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या टेस्ट मालिकेकडं फक्त भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांचं नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट मालिकेतही भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे पडसाद उमटले आहेत.
ऑस्ट्रेलियन खेळाडू ट्रोल
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट मालिकेत बॅट आणि बॉलचा चांगला संघर्ष पाहयला मिळत आहे. पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर्सनं गाजवली. तर दुसरी टेस्ट अजिंक्य रहाणेच्या शतकामुळे संस्मरणीय ठरली. या मालिकेत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि जो बर्न्स (Joe Burns) हे ऑस्ट्रेलियन बॅट्समन साफ अपयशी ठरले आहेत. जो बर्न्सची खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियन टीममधून हकालपट्टी झाली आहे. तर स्टीव्ह स्मिथला या मालिकेत आतापर्यंत फक्त 10 रन करता आले आहेत.
(हे वाचा-IPL 2020मध्ये सट्टा लावण्यासाठी नर्सने थेट भारतीय खेळाडूशी केला संपर्क)
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या न्यूझीलंड टीमच्या फॅननं ही संधी साधत या दोन्ही खेळाडूंना ट्रोल केलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरी टेस्ट पाहण्यासाठी हा फॅन मैदानात उपस्थित होता. यावेळी त्यानं दाखवलेला एक बोर्ड चांगलाच लक्षवेधी ठरला.
(हे वाचा-IND Vs AUS: सिडनी टेस्टसाठी महत्त्वाच्या ठरतील या मैदानावरच्या 9 खास गोष्टी)
'तुम्हाला खूप कमी वापरलेल्या बॅट्स खरेदी करायच्या असतील तर स्टीव्ह स्मिथ आणि जो बर्न्स यांना संपर्क करा', असा बोर्ड त्यानं मैदानात झळकावला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन टीममधून काढल्यानंतर जो बर्न्सनं लगेच बिग बॅश लीगमध्ये आक्रमक अर्धशतक झळकावलं आहे. आता स्टीव्ह स्मिथवर चांगल्या कामगिरीचा दबाव असून, 'तो सिडनी टेस्टमध्ये कसा खेळतो?' याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.