सिडनी, 5 जानेवारी: नव वर्षाच्या निमित्तानं भारताच्या (Team India) पाच खेळाडूंनी मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवण केलं होतं. त्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याचे जोरदार पडसाद उमटले. ऑस्ट्रेलियन मीडियानं त्यांच्यावर कोव्हिड प्रोटोकॉल मोडल्याची टीका केली. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ (Cricket Australia) या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची घोषणा केली. BCCI नं मात्र हे सर्व आरोप फेटाळत खेळाडूंच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय टीम आता मेलबर्नमधून सिडनीमध्ये दाखल झाली आहे. तरीही, हा वाद काही संपलेला दिसत नाही. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी त्या सर्व खेळाडूंची ट्विटरवरुन ‘शाळा’ घेतली आहे. मांजरेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही, पण त्यांचा इशारा रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानं वादात अडकलेल्या क्रिकेटपटूंकडेच आहे. काय म्हणाले मांजरेकर? मांजरेकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘सोपी गोष्ट आहे. तुम्ही एक तर स्वत: निवडीसाठी उपलब्ध ठेवू नका किंवा निवड झाली तर ‘बायो बबल्सच्या’ कडक नियमांचं पालन करा. तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र करु शकत नाही.’ संजय मांजेकर यांच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे.
It’s quite simple really. Either rule yourself out for selection or once selected respect the bio bubble & the strict protocols. Can’t have it both ways.#INDvsAUSTest
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) January 4, 2021
काय आहे प्रकरण? नव्या वर्षाच्या सुरुवातीला रोहित शर्मा (Rohit Sharma), ऋषभ पंत, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर या पाचही खेळाडूंना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं. आता हे सर्व खेळाडू टीम इंडियासोबत सिडनीमध्ये रवाना झाले आहेत. या सर्वांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सराव करताना कडक नियमांचं पालन करण्याचे निर्देश ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियानं’ दिले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट सात जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरु होणार आहे.

)







