बडोदा, 16 जानेवारी : टीम इंडियाचे ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांचे वडिल हिमांशू पांड्या (Himanshu Pandya) यांचं शनिवारी निधन झालं आहे. हृदयविकाराचा धक्क्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. देशाला दोन आक्रमक खेळाडू देण्यासाठी हिमांशू पांड्या यांनी मोठा त्याग केला होता. आपल्या मुलांच्या क्रिकेटसाठी त्यांनी स्वत:चा व्यवसाय बंद केला आणि दुसऱ्या शहरात स्थायिक झाले.
हिमांशू सुरतमध्ये कार फायनान्सचा छोटा व्यवसाय करत होते. मुलांच्या क्रिकेट करियरसाठी त्यांनी तो व्यवसाय बंद केला आणि बडोद्यामध्ये स्थायिक झाले. त्यावेळी हार्दिक पाच वर्षांचा होता. बडोदामध्येच त्यांनी मुलांना क्रिकेटची उत्तम सुविधा दिली. टीम इंडियाचे माजी विकेट किपर किरण मोरे (Kiran Modre) यांच्या अकादामीमध्ये दोघांना क्रिकेट प्रशिक्षणासाठी पाठवलं.
दोन्ही मुलं ही हळवी बाजू
पांड्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांचं स्वत:चं घरही नव्हतं. या परिस्थितीमध्येही हिमांशू यांनी त्यांच्या मुलांना कशाचीही कमतरता भासू दिली नाही. ‘मुलांचा विषय काढला की अश्रू थांबवू शकत नाही,’ अशी भावना हिमांशू यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केली होती.
दोन्ही मुलांना कमी वयात क्रिकेटचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केल्यामुळे नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. नातेवाईकांच्या आक्षेपानंतरही हिमांशू त्यांच्या ध्येयावर कायम होते. हिमांशू यांच्याच त्यागामुळे हार्दिक आणि कृणाल हे दोघंही भारतीय टीमचे (Team India) सदस्य बनू शकले.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या आयपीएल टीमक़डून चांगला खेळ केल्यामुळे हार्दिकची 2016 साली टीम इंडियामध्ये पहिल्यांदा निवड झाली. त्यानंतर 2017 साली श्रीलंकेविरुद्ध शतक झळकवल्यानंतर हार्दिकनं त्याच्या वडिलांना कार भेट दिली होती. हार्दिकनंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2018 साली कृणाल पांड्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
कृणाल पांड्या घरी रवाना
दरम्यान कृणाल पांड्या सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत बडोदा टीमचा कॅप्टन होता. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजताच तो बायो-बबलमधून बाहेर आला आहे. हार्दिक या स्पर्धेत सहभागी झालेला नाही. ऑस्ट्रेलियातील वन-डे आणि T-20 मालिका संपल्यानंतर हार्दिक भारतामध्ये परतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya, Krunal Pandya