मुंबई, 24 डिसेंबर : टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला आहे. 1998 साली हरभजननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य असलेला हरभजन 2016 साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये सक्रीय होता. यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये हरभजन कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सदस्य होता. हरभजन निवृत्तीनंतर पंजाबच्या राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता आहे.
हरभजननं कही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंग सिद्धूची भेट घेतली होती. तेव्हा तो लवकरच राजकारणात उतरणार अशी चर्चा सुरु झाली. त्यावेळी हरभजननं ही शक्यता फेटाळली होती. पण, पुढच्यावर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी हरभजन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये 711 विकेट्स घेणाऱ्या हरभजननं शुक्रवारी ट्विट करत निवृत्तीची घोषणा केली. 'सर्व चांगल्या गोष्टींचा कधीतरी शेवट होतो. मी आज मला सर्व काही देणाऱ्या खेळाला अलविदा करत आहे. हा 23 वर्षांचा मोठा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय करण्यात मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासू आभार.' असे ट्विट हरभजनने केले आहे.
All good things come to an end and today as I bid adieu to the game that has given me everything in life, I would like to thank everyone who made this 23-year-long journey beautiful and memorable. My heartfelt thank you 🙏 Grateful .https://t.co/iD6WHU46MU
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 24, 2021
हरभजनने 1998 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने टीम इंडियाकडून 103 टेस्टमध्ये 417 विकेट्स घेतल्या. तसंच 2 शतकांसह 2235 रन काढले. तर 236 वन-डेमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट्स आहेत. टी20 इंटरनॅशनलमध्ये हरभजनच्या नावावर 28 मॅचमध्ये 25 विकेट्सचू नोंद आहे. टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे (619), कपिल देव (434) आणि आर. अश्विन (427) यांच्यानतर हरभजननं सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Harbhajan singh, Punjab