मुंबई, 21 फेब्रुवारी : टीम इंडियाचा अनुभवी विकेट किपर - बॅटर ऋद्धीमान साहाची (Wriddhiman Saha) श्रीलंका विरूद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर नाराज झालेल्या साहानं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर टीका केली होती. द्रविडनं आपल्याला निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. असा दावा, साहानं केला होता. हे प्रकरण अद्याप शांत झालेलं नाही. त्यानंतर साहानं आणखी एका वादग्रस्त प्रकरणाला वाचा फोडली आहे. साहानं शनिवारी व्हॉट्सअप स्क्रीनचॅट शेअर करत एका कथित पत्रकारानं मुलाखतीसाठी धमकी दिल्याचा आरोप केला होता. साहाला या प्रकरणात माजी क्रिकेटपटूंचा पाठिंबा मिळत आहे. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही या प्रकरणात साहाला पाठिंबा दिला आहे. शास्त्रींनी ट्विट करत या प्रकरणात साहाची बाजू घेतली आहे. ‘एका पत्रकाराकडून खेळाडूला धमकी दिले जाणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. हा आपल्या पदाचा गैरवापर करणे आहे. भारतीय टीमबाबत हा प्रकार सतत होत आहे. बीसीसीआय अध्यक्षांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली पाहिजे. ती व्यक्ती कोण आहे याचा शोध घ्यायला हवा. ही प्रत्येक क्रिकेटपटूच्या हिताची गोष्य आहे. टीम मॅन ऋद्धीमान साहाबाबत घडलेलं हे एक गंभीर प्रकरण आहे.’ असं मत शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
Shocking a player being threatened by a journo. Blatant position abuse. Something that's happening too frequently with #TeamIndia. Time for the BCCI PREZ to dive in. Find out who the person is in the interest of every cricketer. This is serious coming from ultimate team man WS https://t.co/gaRyfYVCrs
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) February 20, 2022
यापूर्वी साहानं शनिवारी ट्विटरवर स्क्रीन शॉट शेअर केला होता. या स्क्रीनशॉटनुसार तो पत्रकार साहाला म्हणतो की, ‘मला मुलाखत दिलीस तर चांगले होईल. त्यांनी (निवड समिती) फक्त एक विकेट किपर निवडला आहे. तू 11 पत्रकार निवडण्याचा प्रयत्न केलास. माझ्या मते ते बरोबर नाही. तुला जास्त मदत करू शकेल त्याची निवड कर. तू माझा कॉल घेतला नाहीस. मी आता तुझी कधीही मुलाखत घेणार नाही. मी ही गोष्ट लक्षात ठेवेन.’ ‘भारतीय क्रिकेटधील माझ्या योगदानानंतरही एका तथाकथित ‘सन्माननीय’ पत्रकाराकडून मला हे सहन करावं लागत आहे’, अशी भावना साहाने व्यक्त केली होती. ऋद्धीमान साहाच्या आरोपांना द्रविडनं दिलं उत्तर, म्हणाला… ऋद्धीमान साहाला या प्रकरणात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, आरपी सिंह यांनी पाठिंबा दिला आहे. त्या पत्रकाराचं नाव साहानं जाहीर करावं अशी मागणी या क्रिकेटपटूंनी केली आहे.