मुंबई, 7 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमसाठी (Australia Cricket Team) मागील पाच महिने चांगले गेले आहेत. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं. त्यानंतर अॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडचा 4-0 असा मोठ्या फरकानं पराभव केला. या दमदार कामगिरीनंतरही ऑस्ट्रेलियन क्रिकेट सध्या नकारात्मक कारणांमुळे चर्चेत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या यशस्वी कामगिरीचे मार्गदर्शक टीमचे हेड कोच जस्टीन लँगर (Justin Langer) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. लँगर यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात खेळाडू आणि बोर्डाला आरसा दाखवला आहे. लँगर यांच्या शिस्तीला खेळाडूंचा आक्षेप होता. त्या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला, असे मानले जाते. लँगर यांनी या पत्रात याबाबत माफी मागत टोला देखील लगावला आहे. ‘मी माझ्या आयुष्यात प्रामाणिकपणा, आदर, विश्वास आणि सत्य या मुल्यांची जपणूक केली आहे. कधी-कधी हे मुल्य कठोर वाटतात. त्याबद्दल मी माफी मागतो.’ असे लँगर यांनी या पत्रात लिहिले आहे. गेल्या 12 महिन्यांत त्यांच्या कार्यकाळाबाबत ऑस्ट्रेलियन मीडियात मोठी चर्चा सुरू होती. त्यामुळे आपल्यावर आणि कुटुंबावर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. तसंच संपूर्ण कार्यकाळात प्रामाणिकपणा आणि आदर या गोष्टींची मी जपणूक केली अशी आशा असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियात यावर्षी टी20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपपर्यंत कोचपदाची जबाबदारी सांभाळावी, असा प्रस्ताव क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दिला होता. आपण हा प्रस्ताव फेटाळल्याचं लँगर यांनी सांगितलं. तसंच मागील पाच महिन्यांच्या कामगिरीवर त्यांनी समाधान व्यक्त केले. IND vs WI : रोहित शर्मा कॅप्टन होताच बदललं DRS चं नाव! गावसकरांनी केलं बारसं ‘मी टीमचा निरोप घेताना सुदैवी आहे. टी20 वर्ल्ड कप आणि अॅशेस सीरिज जिंकणाऱ्या टीमचा मी सदस्य होतो. टेस्ट टीम नंबर 1 वर पोहचलेली मी पाहिली. विस्डेन ‘कोच ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये जागा मिळाली. या सर्व गोष्टी मागच्या पाच महिन्यांत घडल्या.’ असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.