इस्लामाबाद, 18 नोव्हेंबर : पाकिस्तानमध्ये हळू हळू आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतायला सुरुवात झाली आहे. इंग्लंडची टीम 2021 साली ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही टीममध्ये दोन टी-20 मॅच खेळवण्यात येतील. 14 आणि 15 ऑक्टोबर 2021 ला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कराचीमध्ये दोन टी-20 सामने खेळवले जातील, यानंतर दोन्ही टीम टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येतील. पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी इंग्लंडची टीम कराचीमध्ये 12 ऑक्टोबरला दाखल होईल. दोन टी-20 मॅच खेळल्यानंतर 16 ऑक्टोबरला दोन्ही टीम भारतात येण्यासाठी निघतील. याआधी 2005 साली इंग्लंडच्या टीमने पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यात दोन्ही टीममध्ये तीन टेस्ट आणि पाच वनडे मॅचची सीरिज खेळवली गेली होती. यानंतर 2012 आणि 2015 साली दोन्ही देश युएईमध्ये खेळले होते. पाकिस्तानमधल्या सुरक्षेच्या कारणास्तव इतर टीमप्रमाणेच इंग्लंडची टीमही क्रिकेट खेळत नव्हती. सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंडला 2021 सालच्या सुरुवातीला छोट्या सीरिजसाठी बोलावलं होतं, पण इंग्लंडची टीमला श्रीलंका आणि भारतात सीरिज खेळायची आहे. तर काही टी-20 चे दिग्गज खेळाडू बीग बॅश लीगमध्ये खेळणार आहेत. छोट्या सीरिजसाठी इंग्लंडच्या टीमला चार्टर्ड विमानाने प्रवास करावा लागेल. दुबईमध्ये सराव शिबीर करुन टीमला पाकिस्तानमध्ये घेऊन जाणं आणि छोटी सीरिज खेळणं इंग्लंड बोर्डाला आर्थिकदृष्ट्या महाग पडेल, त्यामुळे ही सीरिज ऑक्टोबर महिन्यात खेळवली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.