चेन्नई, 25 मार्च : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएलच्या बाराव्या हंगामाची सुरूवात दणक्यात केली. पहिल्याच सामन्यात चेन्नईनं बंगळुरूवर सात विकेट राखून सहज विजय मिळवला. आता चेन्नईचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरोधात फिरोज शाह कोटला मैदानावर होणार आहे. याकरिता चेन्नईचा संघ दिल्लीकरिता रवाना झाला आहे. दरम्यान पहिल्या विजयानंतर काहीसे सुखावलेल्या संघाने चेन्नईच्या विमानतळावरच मस्ती करण्यास सुरूवात केली. खेळाडूंनी विमानतळावर एक सेल्फी व्हिडीओ तयार केला. दरम्यान, फावल्या वेळेत गोलंदाज मोहित शर्मानं चेन्नईच्या खेळाडूंची मुलाखत घेतली.
या मुलाखतीत केदार जाधव चेन्नई संघावर स्तुतीसुमन उधळत असताना कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं केदारलाच ट्रोल केलं. या व्हिडीओमध्ये जाधवनं,‘‘मागील हंगाम आणि आताच्या हंगामातील पहिल्या सामन्यात बरेच साम्य आहे. आम्ही गतवर्षी पहिला सामना जिंकलो होतो आणि त्यावेळी मी खेळपट्टीवर उपस्थित होतो आणि यंदाही तसेच घडले.’’ असे वक्तव्य केल्यानंतर धोनीनं जाधववर गुगली टाकत, परत घरी जायचा प्लॅन करत आहेस का?’’, असा सवाल केदारला केला.
When you don't wanna leave #HomeSweetDen! #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/69o7cnEz9Y
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2019
पुढच्या सामन्यासाठी दिल्लीला जाण्याआधी धोनी आपल्या संपूर्ण संघासोबत चेन्नईच्या विमातळावर वेळ घालवताना दिसला. यावेळी धोनीनं आपल्या फावल्या वेळेत विमानतळावर खाली बसत, काही काळ मजा मस्ती केली. यावेळी धोनी एका वेगळ्याच मुडमध्ये पाहायला मिळाला.