मुंबई, 27 एप्रिल : पॅट कमिन्सनंतर (Pat Cummins) ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली (Brett Lee) देखील भारताच्या मदतीसाठी धावला आहे. ब्रेट लीने भारतातल्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी 1 बिटकॉईन म्हणजेच जवळपास 42 लाख रुपये दिले आहेत. याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू पॅट कमिन्सने ऑक्सिजन पुरवठ्यासाठीच 50 हजार डॉलर म्हणजे जवळपास 37 लाख रुपये पीएम केयर्स फंडसाठी दिले आहेत. कमिन्सने यासोबतच सहकारी खेळाडूंनाही मदत करण्याचं आवाहन केलं होतं. ‘भारत माझं दुसरं घर आहे. क्रिकेट खेळत असताना मला इथल्या लोकांकडून जे प्रेम मिळालं, ते निवृत्तीनंतरही कायम आहे. भारतीयांसाठी माझ्या मनात खास स्थान आहे. या संकटकाळात लोकांचा मृत्यू होताना बघणं हृदयद्रावक आहे. भारतीयांची मदत करण्यासाठी थोडं योगदान करण्याची संधी मला मिळाली, त्याबाबत मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी www.cyptorelief.in ला एक बिटकॉईन दान करत आहे, यातून भारतातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जाईल,’ असं ब्रेट ली म्हणाला.
Well done @patcummins30 🙏🏻 pic.twitter.com/iCeU6933Kp
— @BrettLee_58 (@BrettLee_58) April 27, 2021
याआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सनेही खेळाडूंना मदतीचं आवाहन केलं होतं. ‘भारतामध्ये मला गेल्या काही वर्षांपासून खूप प्रेम मिळालं आहे. इथली लोकं प्रेमळ आणि पाठिंबा देणारी आहेत. मागच्या काही काळापासून कोरोना व्हायरसमुळे भारतासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत,’ असं कमिन्स म्हणाला होता. कमिन्सने पीएम केयर फंडाला दिलेल्या 37 लाख रुपयांच्या देणगीनंतर त्याचं कौतुक होत आहे.