मुंबई, 24 मे : जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयच्या (BCCI) आयपीएल (IPL) या स्पर्धेत खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागते. आयपीएल ही जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग आहे. पण या लीगमध्येही खेळाडूंना त्यांच्या पगारासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागत आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने (Brad Hodge) दावा केला आहे, की 2011 सालच्या आयपीएलचा पगार त्याला अजून मिळालेला नाही. एवढच नाही, तर यावरून हॉजने बीसीसीआयला सवालही विचारला आहे. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय महिला टीमला 2019 टी-20 वर्ल्ड कपची रक्कम अजून मिळालेली नाही. या वृत्तावर ब्रॅड हॉजने सोशल मीडियावर कमेंट केली. ‘कोची टस्कर्सकडून (Kochi Tuskers) खेळणाऱ्या खेळाडूंना 10 वर्षांपूर्वीची 35 टक्के रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही. बीसीसीआय याबाबत माहिती घेऊ शकते,’ असं हॉज म्हणाला. कोची टस्कर्सची टीम 2011 सालीच आयपीएल खेळण्यासाठी उतरली होती, पण हॉजला बोर्डाकडून याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
Players are still owed 35% of their money earned from ten years ago from the @IPL representing Kochi tuskers. Any chance @BCCI could locate that money?
— Brad Hodge (@bradhodge007) May 24, 2021
आयपीएलचा यंदाचा मोसम कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आला. या मोसमात 60 पैकी 29 सामने झाले आहेत. आता उरलेल्या मॅच झाल्या नाही तर बीसीसीआयचं 2,500 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी स्वत:च याबाबत सांगितलं. बोर्डाला स्वत:च्या पैशांची चिंता आहे, पण खेळाडूंना 10 वर्ष त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाहीत, पण याबाबत बोर्डाने कोणतीही पावलं उचलेली नाहीत. भारतीय महिला टीमला त्यांच्या हक्काचे पैसे या आठवड्याच्या शेवटी मिळतील, याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली. पैसे द्यायला एवढा वेळ का लागला? असा प्रश्नही विचारण्यात आला तेव्हा, आम्हालाच मागच्यावर्षी शेवटी ही रक्कम मिळाल्याचं उत्तर अधिकाऱ्याने दिलं. टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये जवळपास 3.70 कोटी रुपये मिळाले होते.