सिडनी, 23 जानेवारी : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने नुकतंच पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने विजय मिळवला. आता पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना 24, दुसरा सामना 26 जानेवारी तर तिसरा सामना 29 जानेवारी रोजी होणार आहे. मालिकेला सुरुवात होण्याआधी ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू क्रिकेटर एश्ले गार्डनर हिने होबार्टमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तिने म्हटलं की, 26 जानेवारी माझ्यासाठी शोक व्यक्त करायचा दिवस आहे. सामन्याच्या तारखेवरून नाराजी व्यक्त केली असली तरी सामन्यासाठी ती उपलब्ध असणार आहे.
गार्डनर ही अस्ट्रेलियाची मूळची नागरिक आहे. 26 जानेवारी हा ऑस्ट्रेलिया डे म्हणून साजरा केला जातो. पण अनेक लोक या राष्ट्रीय दिवसाला विरोध करतात. विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा दिवस देशातील मूलनिवासींचा अपमान आहे. कारण 26 जानेवारीलाच ब्रिटनचा पहिला ताफा ऑस्ट्रेलियात उतरला होता.
हेही वाचा : ईशान किशनला वॉर्निंग! पुन्हा चूक केल्यास वनडे सामन्यातून होणार निलंबन
गार्डनरने मोठी पोस्ट करत म्हटलं की, 26 जानेवारी हा माझ्यासाठी आणि माझ्या लोकांसाठी दु:खाचा आणि शोकाचा दिवस आहे. माझी संस्कृती अशी आहे की माझ्या हृदयाजवळ मी ती ठेवते आणि त्याबद्दल बोलणं माझ्यासाठी अभिमानाचं असतं. मी नशीबवान आहे की ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळण्याची संधी मला मिळाली. याचं स्वप्न मी लहानपणापासून पाहिलं होतं. पण माझं नशीब फुटकं की या वर्षी २६ जानेवारीला ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा सामना आहे आणि मला वैयक्तिकरित्या चांगलं वाटत नाहीय. त्या लोकांसाठीही चांगलं वाटत नाही ज्यांचे मी प्रतिनिधीत्व करतेय असंही गार्डनरने म्हटलं.
ज्या लोकांना २६ जानेवारीबाबत माहिती नाही त्यांना सांगू इच्छिते की याच दिवशी नरसंहार आणि बेदखल करण्यास सुरुवात झाली होती. सामन्यादिवशी मी मैदानात उतरेन तेव्हा नक्कीच माझ्या सर्व पुर्वजांबद्दल विचार करेन असंही गार्डनरने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket