Home /News /sport /

Womens T20 World Cup AUS vs SA : आफ्रिकेचं स्वप्न भंगलं, वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतासोबत भिडणार ऑस्ट्रेलिया

Womens T20 World Cup AUS vs SA : आफ्रिकेचं स्वप्न भंगलं, वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतासोबत भिडणार ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळं रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना पाहायला मिळणार आहे.

    सिडनी, 05 मार्च : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळं रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पावसामुळं सामना कमी षटकांचा खेळला गेला. मात्र मेगन शूटच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. त्यामुळं ऑस्ट्रेलियानं हा सामना 5 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलिया संघाने पहिले फलंदाजी करत दक्षिण आफ्रिका संघाला 135 धावांचे आव्हान दिले. मात्र पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला 13 षटकांमध्ये 98 धावांचे आव्हान देण्यात आले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्याच ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका बसला. लिजेल ली 10 धावांवर बाद झाली. मोलिनेक्सने ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. तर, कर्णधार डेन वॅन निकेर्क 12 धावांवर माघारी परतली. सुन लुस आणि लॉरा वॉलवार्ट यांनी चांगली भागीदारी केली. मात्र 12 ओव्हरमध्ये आक्रमक खेळी करण्याच्या नादात लुस 21 धावांवर बाद झाली. ऑस्ट्रेलियाकडून शूटने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तत्पूर्वी, आफ्रिकेने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कांगारूंनी 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 134 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेग लेनिंगने सर्वात जास्त 49 धावा केल्या तर, बेथ मूनीने 28 धावा केल्या. दरम्यान, याआधी इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेला पहिला सेमीफायनल सामना पावसामुळं रद्द झाला. त्यामुळं गुणतालिकेनुसार भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. तब्बल सात वर्षांनी पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा पहिला सामना झाला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धुळ चारली होता. पूनम यादवच्या 4 विकेटच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला होता. आता फायनलमध्ये पुन्हा हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket, India women cricket team, T20 world cup

    पुढील बातम्या