ऍडलेड, 17 डिसेंबर : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Australia vs England) यांच्यात ऍडलेडमध्ये सुरू असलेल्या डे-नाईट टेस्टचा (The Ashes) दुसरा दिवस वीज पडल्यामुळे लवकर थांबवण्यात आला. इंग्लंडची टीम बॅटिंग करत असताना ही घटना घडली. इंग्लंडच्या इनिंगच्या 9व्या ओव्हर मायकल नेसर बॉलिंग टाकत होता, तेव्हा जोरदार आवाज झाला आणि स्टेडियमजवळ वीज (Lightening at Adelaide Stadium) पडली. सुदैवाने वीज मैदानात पडली नाही, अन्यथा मोठा अपघात झाला असता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याचा एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो खूपच भीतीदायक आहे. वीज पडल्यानंतर अंपायरनी खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये जायला सांगितलं.
The only thing that could save England tonight was thunderbolts and lightning, very very frightening #Ashes https://t.co/1ckoPz3QmJ
— Lui Zacher (@lui_zacher) December 17, 2021
वीज पडल्यानंतर थोडा पाऊसही पडायला सुरुवात झाली, ज्यामुळे अंपायरनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी न झालेल्या ओव्हर तिसऱ्या दिवशी होणार आहेत, त्यामुळे सामना 19 मिनीटं लवकर सुरू होईल. ऍशेसच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 17 रनवर 2 विकेट एवढा झाला आहे. हसीब हमीद 6 रनवर आणि रोरी बर्न्स 4 रनवर आऊट झाले. डेव्हिड मलान 1 आणि कर्णधार जो रूट 5 रनवर नाबाद खेळत आहेत. त्याआधी ऑस्ट्रेलियाने पहिली इनिंग 473 रनवर घोषित केली. मार्नस लाबुशेनने शानदार शतक केलं. 305 बॉलच्या या इनिंगमध्ये त्याने 8 फोर मारले. स्टीव्ह स्मिथ 93 रनवर तर डेव्हिड वॉर्नरही शतकापासून हुकला. विकेट कीपर एलेक्स कॅरीने टेस्ट करियरमधलं आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याने 107 बॉलमध्ये 51 रन केले. याशिवाय खालच्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मिचेल स्टार्क आणि मायकल नेसरने उत्कृष्ट कामगिरी केली. नेसरने 24 बॉलमध्ये 35 रन आणि स्टार्कने 39 बॉलमध्ये 35 रन केले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 3 आणि जेम्स अंडरसनने 2 विकेट घेतल्या. इंग्लंड अजूनही 456 रनने पिछाडीवर आहे. या सामन्यात पॅट कमिन्सऐवजी स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. ऍडलेड टेस्टआधी कमिन्स हॉटेलमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आला होता, त्यामुळे कमिन्स या टेस्टमधून बाहेर झाला. तो सध्या आयसोलेशनमध्ये आहे.