मुंबई, 14 मार्च : भारत पाकिस्तान यांच्या क्रिकेट बोर्डात सध्या आशिया कप 2023 वरून वाद सुरु आहे. यंदाच्या आशिया कप पूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही असे सांगितले होते. तेव्हा आशिया कपचे आयोजन नक्की कुठे करायचे या विषयावर आयसीसीची बैठक ही येत्या 18 ते 20 मार्च रोजी होणार आहे. परंतु या आधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठीयांनी याबाबत मोठे वक्तव्य केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आयसीसीच्या बैठकीपूर्वी पत्रकार परिषद घेतली . यात ते म्हणाले, “सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून भारतीय संघ ज्या प्रकारे पाकिस्तानात येण्यास नकार देत आहे, त्याच प्रकारे पाकिस्तानही भारतात येण्यास नकार देईल, हा मुद्दा मी नक्कीच आयसीसीच्या बैठकीत मांडेन”, असे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात भारत पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डांमध्ये सुरु असलेल्या वादावर बैठक झाली होती. परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आता पुढील बैठक 18 ते 20 मार्च दरम्यान दुबईत होईल, तेव्हा आशिया कप २०२३ च्या आयोजना संदर्भात कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इतकच नाही तर 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संदर्भात देखील पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी भारताला धमकी देत हे केवळ आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाबद्दलच नाही असे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.