दिल्ली, 17 जुलै : आशिया कप 2023 ची तारीख निश्चित झाली आहे. मात्र अद्याप शेड्युल जारी करण्यात आलेलं नाहीय. पाकिस्तानला एकदिवसीय स्पर्धेचं यजमानपमद मिळालं आहे. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात सामने खेळवण्याच्या ठिकाणावरून मोठा वादही झाला. शेवटी पीसीबीने दिलेल्या हायब्रीड मॉडेलवर स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. आशिया कपमधील 4 सामने पाकिस्तानमध्ये तर 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. हे सामने 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. श्रीलंका आशिया कपचे गतविजेते आहेत. भारतात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेआधीची ही स्पर्धा तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. क्रिकेट पाकिस्तानच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान ग्रुप राउंडमध्ये २ सप्टेंबरला आमने सामने येऊ शकतात. स्पर्धेत एकूण सहा संघ उतरणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळचे संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये तीन संघांचे दोन ग्रुप असतील. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार आहेत. दोन्ही ग्रुपच्या टॉप दोन संघ सुपर 4 मध्ये जातील. सुपर 4 मध्ये गेल्यास भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा 10 सप्टेंबरला एकमेकांविरुद्ध लढू शकतात. दोन्ही सामने दांबुला इथं खेळले जाण्याची शक्यता आहे. Wimbledon : पराभवानंतर मुलाचा उल्लेख करताना जोकोविचला अश्रू अनावर, VIDEO VIRAL
आशिया कपचे शेड्युल 19 जुलै रोजी जारी होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचले तर 17 सप्टेंबरला पुन्हा दोन्ही संघांमध्ये लढत होईल. 15 दिवसात तीनदा दोन्ही संघ आमने सामने येऊ शकतात. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक यांच्यातील सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर एक लाखापेक्षा जास्त चाहते पोहोचू शकतात. अमहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.
गेल्या वर्षी आशिया कपमध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना टीम इंडियाला फायनल गाठता आली नव्हती. तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले होते. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला होता. सुपर 4 मध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभूत व्हावं लागलं होतं. यामुळे भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. यावेळी फायनल सामना श्रीलंकेत होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा श्रीलंका यंदाच्या विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहेत.