शारजाह, 7 सप्टेंबर : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानने अफगाणिस्तानवर (Pakistan vs Afghanistan) थरारक विजय मिळवला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 11 रनची गरज असताना 10व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या नसीम शाहने फजल हक फारुकीला पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्स मारल्या, ज्यामुळे पाकिस्तानचा विजय झाला. पाकिस्तानच्या या विजयासोबतच टीम इंडियाचं आशिया कपमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या या सामन्यात मैदानात राडादेखील पाहायला मिळाला. पाकिस्तानचा बॅटर असिफ अली (Asif Ali) आणि अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर फरीद अहमद (Fareed Ahmed) यांच्यात मैदानातच बाचाबाची झाली. असिफ अलीने आऊट झाल्यानंतर फरीद अहमदवर बॅट उगारली, अखेर अफगाणिस्तानचा खेळाडू आणि अंपायर यांना मध्यस्थी करावी लागली. 19 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर असिफ अलीने फरीद अहमदला सिक्स मारली, यानंतर पुढच्याच बॉलला फरीदने असिफ अलीला आऊट केलं. असिफची विकेट घेतल्यानंतर फरीद जल्लोष करायला लागला. फरीदचा हा जल्लोष पाहून असिफ अली भडकला आणि त्याने फरीदवर बॅट उगारली.
असिफ अली याने केलेल्या या कृत्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. आता मॅचनंतर आयसीसी त्याच्यावर काय ऍक्शन घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शारजाहच्या मैदानात झालेल्या या सामन्यात जर अफगाणिस्तानचा विजय झाला असता, तर भारताचं आशिया कपमधलं आव्हान कायम राहिलं असतं. पण आता पाकिस्तानचा विजय झाल्यामुळे आशिया कप फायनलच्या दोन टीमही ठरल्या आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आता 11 सप्टेंबरला आशिया कपची फायनल होणार आहे.