बर्मिंगहम, 21 जून : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने थऱारक विजय मिळवला. इंग्लंडच्या बॅझबॉल गेमवर ऑस्ट्रेलियाचा पारंपरिक खेळ भारी पडला. बर्मिंगहममध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिला डाव पहिल्याच दिवशी घोषित केला होता. ते सहज 400 धावांचा आकडा गाठू शकत होते पण बेधडक निर्णय घेत बेन स्टोक्सने 8 बाद 393 धावांवर डाव घोषित केला. पाच दिवसाच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पूर्ण दिवसही फलंदाजी केली नाही. त्यानंतर पहिल्या डावात त्यांना किरकोळ आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात 300 धावांचा आकडाही गाठता आला नाही. यानंतर अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ८ विकेट गमावल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स आणि नाथन लायन यांनी अभेद्य भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने एशेस मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी पहिला डाव 8 बाद 393 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 386 धावा केल्या. तर इंग्लंडचा दुसरा डाव 273 धावातच गुंडाळला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 281 धावांचे आव्हान मिळाले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 92.3 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. इंग्लंडने या सामन्यात अनेक धाडसी निर्णय घेतले. पहिल्या दिवशी ५ पेक्षा अधिक धावगतीने ३९३ धावा करून बॅजबॉल गेम खेळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. किती विकेट गमावल्यात याची काळजी न करता आक्रमक फलंदाजी करण्याचा प्लान इंग्लंडने गेल्या जवळपास 20 कसोटीत खेळला आहे. यात त्यांना बरचंस यशही मिळालं असून त्यांनी 13 हून जास्त कसोटी जिंकल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्येही वनडे स्टाइल खेळ इंग्लंडने या सामन्यांमध्ये केला. इंग्लंडला बॅजबॉल गेम महागात पडला. त्यांनी 78 षटकात 393 धावा केल्या होत्या आणि त्यांच्याकडे 2 विकेट शिल्लक होत्या. तेव्हा सहज 450 धावा इंग्लंडला करता आल्या असत्या. पण बेन स्टोक्सने डाव घोषित करून सर्वांनाच धक्का दिला.इंग्लंडने डाव घोषित केला तेव्हा जो रूट 118 धावांवर तर ओली रॉबिन्सन १७ धावांवर खेळत होता. रूट आणि रॉबिन्सन यांनी 44 चेंडूत 43 धावांची भागिदारी केली होती. दोघांच्या फलंदाजीचा वेग पाहता पुढच्या 7-8 षटकात त्यांनी आणखी 50 धावा सहज केल्या असत्या. मात्र बेन स्टोक्सने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला तोच महागात पडला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने दोन्ही डावात इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला. तर पॅट कमिन्स आणि नाथन लायनने महत्त्वाची भागिदारी करत सामना जिंकून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







