मुंबई, 2 नोव्हेंबर : क्रिकेट आणि टीम इंडियासोबत बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) उल्लेख नेहमीच केला जातो. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) त्याच्या खराब फॉर्मसाठी अनुष्का शर्माला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. आता पुन्हा एकदा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याचं कारण ठरलं बीसीसीआयने (BCCI Tweet) केलेलं एक ट्वीट. अनुष्का शर्माने अर्धशतक केलं, तिने 88 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली, यात 5 फोर आणि एक सिक्सचा समावेश आहे, असं ट्वीट बीसीसीआयने केलं. यानंतर लगेचच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सोशल मीडियावर ट्रेण्ड व्हायला लागले.
अंडर-19 आंतरराज्यीय वनडे स्पर्धेनंतर बीसीसीआयने महिला अंडर-19 वनडे चॅलेंजर ट्रॉफी 2021-22 खेळवण्याचा निर्णय घेतला. आंतरराज्यीय स्पर्धेतल्या खेळाडूंची टीम ए, टीम बी, टीम सी आणि टीम डी मध्ये विभागणी करण्यात आली. या सामन्यातला स्कोअर सांगताना बीसीसीआयच्या महिला ट्वीटर अकाऊंटवर 'अनुष्का शर्माने 88 बॉलमध्ये 52 रन केले, यात 5 फोर आणि एक सिक्स होती. इंडिया बी चा स्कोअर 140/0' असं लिहिण्यात आलं.
बीसीसीआयचं हे ट्वीट अवघ्या काही क्षणांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि चाहत्यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्माला ट्रोल करायला सुरुवात केली.
चॅलेंजर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात इंडिया ए चा सामना इंडिया बी विरुद्ध होता. स्पर्धेतल्या चारही टीम जयपूरमध्ये 2 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत लीग मॅच खेळणार आहेत. जयपूरच्या आरसीए अॅकेडमी ग्राऊंडमध्ये दोन्ही टीमचा सामना झाला. या सामन्यात इंडिय बी कडून खेळताना अनुष्का शर्मा नावाच्या खेळाडूने अर्धशतक केलं. सगळ्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे, कारण इथल्या कामगिरीमुळे महिला खेळाडूंना भारताच्या अंडर-19 टीममधलं स्थान निश्चित करण्यात येईल.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माला ट्रोल करण्यात येत आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडू नका, असं आवाहन विराट आणि अनुष्काने केल्यामुळे दोघांवर टीका केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, BCCI, Virat kohli