मुंबई, 12 फेब्रुवारी : उत्तराखंड क्रिकेट संघासोबतच्या (Uttarakhand Cricket Assosiation) मतभेदानंतर प्रशिक्षक वसीम जाफर (Wasim Jaffer) याने राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर वसीम जाफरवर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचं तसंच ड्रेसिंग रूममध्ये मौलवींना आणल्याचा आरोप झाला. वसीम जाफरने मात्र हे आरोप फेटाळून लावले. आता टीम इंडियाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे (Anil Kumble) वसीम जाफरच्या मदतीला धावून आला आहे. 'मी तुझ्यासोबत आहे वसीम, तू योग्य केलंस. खेळाडू कमनशिबी आहेत, ज्यांना तुझ्यासारखा प्रशिक्षक नसल्याची कमी जाणवेल,' असं ट्विट अनिल कुंबळेने केलं.
दुसरीकडे इरफान पठाणनेही याबाबत भाष्य केलं आहे. तुला या गोष्टींचं स्पष्टीकरण द्यायला लागतंय, हे खूप वाईट आहे, असं इरफान पठाण म्हणाला.
With you Wasim. Did the right thing. Unfortunately it’s the players who’ll miss your mentor ship.
— Anil Kumble (@anilkumble1074) February 11, 2021
Unfortunate that you have to explain this.
— Irfan Pathan (@IrfanPathan) February 11, 2021
काय झाला वाद?
वसीम जाफरने टीममध्ये धर्माच्या आधारावर खेळाडूंची निवड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उत्तराखंड क्रिकेट संघाने केला आहे. पण दुसरीकडे वसीम जाफरने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारताकडून 31 टेस्ट खेळणारा वसीम जाफर म्हणाला, 'उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव माहिम वर्मा यांच्या आरोपांमुळे मला त्रास झाला आहे.' टीम निवडीमध्ये हस्तक्षेप होत असल्यामुळे आणि निवड समिती आणि उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप करत वसीम जाफरने मंगळवारी राजीनामा दिला होता.
'या प्रकरणाला जो काही धार्मिक रंग दिला जात आहे, ते खूप दु:खद आहे. मी इक्बाल अब्दुल्लाचं समर्थन करतो आणि त्याला कर्णधार बनवू इच्छित होतो, हा त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे,' असं जाफर ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाला.
उत्तराखंड टीमच्या सराव सत्रात मौलवींना आणल्याचा आरोपही जाफरने फेटाळून लावला आहे. 'बायो बबलमध्ये मौलवी आले आणि आम्ही नमाज पठण केलं. मौलवी, मौलाना देहरादूनच्या शिबिरात दोन-तीन शुक्रवार आले, पण त्यांना मी बोलावलं नव्हतं,' असं स्पष्टीकरण जाफरने दिलं.
'इक्बाल अब्दुल्लाने नमाजासाठी माझी आणि मॅनेजरची परवानगी मागितली होती. आम्ही रोज खोलीतच नमाज पठण करायचो, पण शुक्रवारचा नमाज एकत्र व्हायचा. नेट प्रॅक्टिसनंतर आम्ही पाच मिनिटं ड्रेसिंग रूममध्ये नमाज पठण केलं. जर हे सांप्रदायिक असतं, तर नमाजासाठी मी सरावाची वेळ बदलली असती, पण मी तसं केलं नाही. यात काय मोठी गोष्ट आहे, मला समजलं नाही,' अशी प्रतिक्रिया जाफरने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Sports, Uttarakhand cricket association, Wasim jaffer resign