कोलकाता, 5 मे : पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) घरी जाण्याची शक्यता आहे. अमित शाह हे सध्या तीन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. शुक्रवार 6 मे रोजी संध्याकाळी 7.10 वाजण्याच्या सुमारास शाह गांगुलीच्या घरी जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोलकात्याच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये संध्याकाळी 6 वाजता अमित शाह एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, या कार्यक्रमात सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुलीही सादरीकरण करणार आहे. कार्यक्रमानंतर डोना अमित शाह यांना घेऊन घरी जाईल, तसंच घरी सौरव गांगुली आणि अमित शाह रात्रीच्या भोजनाचा आस्वाद घेतील, असं सांगितलं जात आहे. 6 मे रोजी अमित शाह कूच बिहारमध्ये बीएसएफच्या तीन बिघा कॉरिडॉरच्या कार्यक्रमात सहभागी होतील, यानंतर दुपारी ते कोलकात्याला जाण्यासाठी निघतील. कोलकात्यामध्ये सुरूवातीला अमित शाह बंगालचे भाजप आमदार आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठकही घेणार आहेत. ऑक्टोबर 2019 साली सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाला, तर अमित शाह यांचे पूत्र जय शाह बीसीसीआयचे (BCCI) सचिव झाले. तेव्हापासूनच सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करेल, असं बोललं जाऊ लागलं. मागच्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांवेळी या चर्चांना आणखी उधाण आलं. आता अमित शाह सौरव गांगुलीच्या घरी जाणार असल्याचं वृत्त समोर येत असल्यामुळे पुन्हा एकदा दादाच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.