नवी दिल्ली, 11 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने (Chris Morris) निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केला आहे. ख्रिस मॉरिसने 2021 च्या अखेरीस निवृत्तीचे संकेत दिले होते. 2021 च्या T20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात त्याची निवड झाली नव्हती. ख्रिस मॉरिस दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. यासोबतच तो आयपीएलचा मोठा खेळाडूही आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत आमने-सामने येत असताना ख्रिस मॉरिसने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र, मॉरिस या मालिकेमध्ये खेळणार नव्हता. आयपीएल 2021 (IPL 2021) पूर्वी झालेल्या लिलावात सर्वांचे अंदाज चुकवून आफ्रिकेचा ख्रिस मॉरीस (Chris Morris) सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 16 कोटी 25 लाखांना खरेदी केले होते. आजवरच्या आयपीएल लिलावात (IPL Auction) कोणत्याही खेळाडूवर लावण्यात आलेली ही सर्वात जास्त बोली आहे. ख्रिस मॉरीसनं 4 टेस्ट, 42 वन-डे आणि 23 आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामध्ये त्यानं अनुक्रमे 12, 48 आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत. ख्रिस मॉरिसने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. ‘आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. माझा प्रवास छोटा असो की मोठा, त्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार. खूपच मजेशीर प्रवास होता. टायटन्स संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आल्याने खूप छान वाटत आहे’, असे त्यानं लिहलंय. हे वाचा - Vodafone Idea Update: वोडाफोन-आयडियामध्ये सरकारची असणार सर्वात मोठी भागीदारी, कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण ख्रिस मॉरीससाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे दरवाजे फार पूर्वीच बंद झाले होते. 2021 मध्ये एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, आता त्याला पुन्हा प्रोटीयाज संघात खेळण्याची संधी मिळणार नाही.
आयपीएलमध्ये बोलबाला - ख्रिस मॉरिस हा आयपीएल 2021 चा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांची मोठी बोली लावून घेतले. मात्र तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. स्पर्धेच्या पहिल्या सहामाहीत त्याची कामगिरी चांगली होती पण यूएईमध्ये मॉरिस दुसऱ्या सहामाहीत सपशेल अपयशी ठरला. त्याने CSK मधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. CSK मध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. यानंतर तो दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचाही भाग होता.