अहमदाबाद, 28 मे : आयपीएल 2023चा अंतिम सामना रविवारी गुजरात आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या इराद्याने उतरतील. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा गुजरात विजेतेपदासाठी उत्सुक आहे तर धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा विजय पटकवण्यासाठी प्रयत्नशील असतील परंतु, या सामन्यावर पावसाचे संकट आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आलेला क्लालिफायर सामन्यात पावसामुळे सुरुवातीला व्यत्यय आला होता. त्यामुळे सामना तासभर उशिराने सुरू करावा लागला होता. अशीच काहीशी परिस्थिती चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या सामन्यातही दिसत आहे. अहमदाबादमध्ये पाऊस थांबायचं नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे आयपीएल 2023 चा अंतिम सामना खेळवला जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच पावसामुळे सामना रद्द झाला तर कोणता संघ चॅम्पियन होणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. सकाळी अहमदाबादचे वातावरण सामान्य असून ऊन पडलं आहे. मात्र सायंकाळी वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग येतील असं Accuweatherने म्हटलं होत. त्यानुसार अहमदाबादमध्ये संध्याकाळी पासून पाऊस सुरु झाला. काहीवेळाने सामना पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा चाहत्यांना होती, परंतु रात्री ९ : ४५ पर्यंत तरी पाऊस थांबायचे नाव घेताना दिसत नाही.
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये क्वालिफायर २ साठी राखीव दिवस होता. पण यावर्षी असा राखीव दिवस नव्हता. दरम्यान, फायनलसाठी मात्र एक दिवस राखीव ठेण्यात आला आहे. आता रविवारी सामना होऊ न शकल्याने आज सामना होणार आहे. आज पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, तरीही सामना पावसामुळे सायंकाळी साडे सात वाजता नियोजित वेळेनुसार सुरु झाला नाही तर किमान 5-5 षटकांचा सामना खेळवण्यासाठी 11 वाजून 56 मिनिटांपर्यंत कट ऑफ वेळ राहील. जर सामना 8 वाजता सुरू झाला तर कट ऑफ टाइम 12.26 पर्यंत असेल. या वेळेपर्यंत पंच 5-5 षटकांचा सामना होण्यासाठी वाट पाहतील. कट ऑफ टाइमनंतरही सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हरमध्येही पाऊस पडत राहिला आणि वेळ न मिळाल्यास चॅम्पियन ठरवण्याचा निर्णय लीग फेरीतील पॉइंट टेबलच्या आधारे घेतला जाईल. आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये गुजरात टायटन्स 20 पॉइंटसह अव्वल स्थानी होते. तर चेन्नई सुपर किंग्ज 17 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे पावसाने सामना रद्द करावा लागल्यास गुजरात टायटन्सला विजेता घोषित केलं जाईल.