मुंबई, 11 डिसेंबर : मुंबईचा युवा बुद्धिबळपटू अव्दय धूत (Chess Player Advay Dhoot) याने युरोपीय सर्किटमधल्या जर्मनी आणि फ्रान्समध्ये बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभागी होत जोरदार कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे तो भारताचा अव्वल ज्युनिअर बुद्धिबळपटू (Top Junior Chess Player) ठरला आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाने नुकतीच नव्या खेळाडूंची रेटिंग यादी जाहीर केली असून, या यादीत 8 वर्षांच्या अव्दयने भारतातील टॉप चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं आहे. अव्दयनं वयाच्या चौथ्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायला सुरवात केली. तेव्हापासून त्याने विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत विजय संपादन केला आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी विद्यालयात इयत्ता तिसरीत शिकणारा हा विद्यार्थी जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटूंपैकी एक असून, सध्या तो 1337 अशा उत्कृष्ट Elo रेटिंगसह महाराष्ट्रातील क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. हेडलबर्ग येथे पार पडलेल्या द जर्मन टुर्नामेंटमध्ये (The German Tournament) 7 देशांचे 174 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. अव्दयने या स्पर्धेत 1400+ पेक्षा जास्त रेट असलेल्या खेळाडूंविरुध्द विजय मिळवला. त्यात 1385 रॅंक असलेला आणि जर्मनीचा दुसरी रॅंक असलेला ज्युनिअर बुद्धिबळपटू बाउर लॉरा सोफी विरुध्द त्याने आश्चर्यकारक विजय मिळवला. हा विजय त्याच्यासाठी सर्वात मोठा ठरला. ला ब्रेसे येथे झालेल्या फ्रेंच टुर्नामेंटमध्ये (French Tournament) देखील त्याने अप्रतिम कामगिरी केली. स्पर्धेच्या 41 व्या एडिशनमध्ये त्याने 9 फेऱ्यांमध्ये 4.5 गुण मिळवले. अद्वयने सप्टेंबर 2021 मध्ये लिचेस लुनागो येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याच्या शाळेचं प्रतिनिधित्व केले. कोणतीही वयोमर्यादा नसलेल्या खुल्या गटात तो टॉप क्वारटाइल (Top Quartile) ठरला. याबाबत अव्दयचे प्रशिक्षक गुट्टुला बालाजी यांनी सांगितलं की ``त्याचे खेळावरील प्रेम त्याला बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात खूप पुढे नेईल. तो त्याच्या समवयस्क खेळाडूंमध्ये सर्वात अव्वल ठरला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात देखील तो असाच यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे``. मुंबईकर असलेल्या 8 वर्षाच्या अद्वयने बुध्दिबळातील निखळ प्रतिभा, आवड आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केलं आहे. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) जगातील सर्व व्यवहार बंद होते, तेव्हा त्याने मिळालेला वेळ सत्कारणी लावत तो प्रगत संकल्पनांचा सराव करण्यासाठी आणि नव्या संकल्पना शिकण्यासाठी वापरला. त्याने राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरवात केली असून, गेल्या 18 महिन्यांत त्याने 50 पेक्षा अधिक ऑनलाइन स्पर्धांमध्ये (Online Tournament) सहभाग घेत आपले कौशल्य विकसित करण्यात यश मिळवले आहे. अद्वय येत्या वर्षभरात त्यातही प्रामुख्यानं जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीत काही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. सप्टेंबरमध्ये तो वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होण्यासाठी जॉर्जियाला (Georgia) जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.