सांगलीची 'चांगली' मुलगी स्मृतीची क्रिकेट कहाणी

स्मृती मंधाना ही सांगलीची खेळाडू आज भारतीय महिला क्रिकेट संघातून खेळताना तमाम भारतीयांसाठी चर्चेचा विषय ठरलीय

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2017 02:40 PM IST

सांगलीची 'चांगली' मुलगी स्मृतीची क्रिकेट कहाणी

2 जुलै : राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी करणारी स्मृती मंधाना ही सांगलीची खेळाडू आज भारतीय महिला क्रिकेट संघातून खेळताना तमाम भारतीयांसाठी चर्चेचा विषय ठरलीय. इंग्लंडविरूद्ध ८६ तर वेस्ट इंडिजविरूद्ध १०६ रन्स करून महिला वर्ल्डकपमध्ये सगळ्यात दमदार कामगिरी तिने करून दाखवलीय.

सांगलीच्या स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. स्मृतीने आपल्या क्रिकेटचा पहिला धडा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गिरवला आहे. वयाच्या सहाव्या वर्षीपासून स्मृतीने सांगलीच्या क्रिकेट ग्राउंडवर आपले वडील आणि मोठा भाऊ श्रावण यांच्यासोबत प्रॅक्टीस करत राष्ट्रीय संघापर्यंत मजल मारलीय. स्मृतीचा मोठा भाऊ श्रावण हा महाराष्ट्र लेव्हलला खेळला आहे. श्रवणला क्रिकेट शिकवत असताना स्मृतीलाही यामध्ये आवड असल्याचं दिसून आल्यावर तिलाही क्रिकेट शिकवण्यास सुरवात केली. सुरवातीला स्मृती ही उजव्या बाजूनं क्रिकेट खेळत असे, पण तिच्या वडिलांनी प्रयत्नपूर्वक लेफ्टी खेळाडू बनवले.

वयाच्या अकराव्या वर्षी महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व करणारी स्मृती आज तिच्या अथक परिश्रमामुळे भारतीय संघाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेतृत्व करीत आहे. आज भारत विरूद्ध पाकिस्तानच्या सामन्यात तिच्याकडून विजयी कामगिरीची सांगलीकर अपेक्षा व्यक्त करत आहेत.

भारतीय संघाकडून स्मृतीने बांगलादेशाविरुद्ध टी - २० सामना खेळलाय. तसंच महाराष्ट्रात अंडर नाईनटीन महिला क्रिकेट संघ आणि सिनियर संघाकडून ती क्रिकेट खेळली आहे. एका वर्षात स्मृतीने तब्बल अकराशे धावा काढल्या होत्या. महाराष्ट्रच्या अंडर नाईन्टीन महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपदसुद्धा स्मृतीने आधी सांभाळलंय. सध्या ती भारताच्या संघाच प्रतिनिधित्व करतेय.आक्रमक फलंदाज अशी स्मृतीची ओळख आहे.

बडोदा येथे २०१३ला झालेल्या एकदिवसीय सामन्यात गुजराथ संघाविरुद्ध स्मृतीने अंडर नाईनटीन महिला क्रिकेट स्पर्धेतील सर्वोच्च धावांचा विश्व विक्रम केला आहे. पन्नास षटकांच्या एकदिवसीय सामन्यात स्मृतीने तब्बल २२४ धावा काढल्या. केवळ १४८ चेंडूवर ३२ चौकारांच्या सहाय्याने स्मृतीने २२४ धावा बनवल्या. एका गड्याच्या मोबदल्यात सर्वोच्च ३७२ धावा करणाऱ्या महाराष्ट्र संघानं हा सामना जिंकला. स्मृतीच्या विश्वविक्रमाची बातमी समजताच सांगलीत जलोष करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...