विवेक गुप्त आणि आशिष सिंह, प्रतिनिधी 05 फेब्रुवारी : रवी पुजारी..मुंबई अंडरवर्ल्डचा कुख्यात चेहरा. परदेशातून मुंबईतल्या आपल्या टोळीची सूत्र हलवणारा कुख्यात गँगस्टर.. खून, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे एक ना अऩेक गुन्हे रवी पुजारीच्या नावावर आहे.
बॉलिवूड, बिल्डर आणि बडे व्यापाऱी त्याच्या टार्गेटवर असतं. खंडणीतून गोळा होणाऱ्या कोट्यवधी रुपयातून त्यानं मुंबई अंडरवर्ल्डमध्ये आपलं वेगळं नेटवर्क तयार केलं होतं. खरंतर पुजारीचं जेमतेम शिक्षण झाले आहे. मात्र, इंग्रजी, हिंदी आणि कन्नड या तीन भाषा त्याला चांगल्या अवगत असल्यामुळं मुंबईतून पसार झाल्यानंतर त्यानं बंगळुरू आणिनंतर मंगळुरूत आपलं अड्डा बनवला.
गुन्हा केल्यानंतर तो न्यूज चॅनल्सला फोनवरुन मुलाखती देत होता. त्यामुळं बोलघेवडा गँगस्टर अशी त्याची ओळख बनली. 2004मध्ये रवी पुजारीनं पहिल्यांदा दीपा बारवर गोळीबार केला. त्यावेळी तो तिथं हजर असल्याचं बोललं जातं. या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबईतील व्यापाऱ्यांनी रवी पुजारीची चांगलीच धास्ती घेतली.
हा तो काळ होता जेव्हा, छोटा राजन दाऊद इब्राहिमच्या टोळीतून बाहेर पडला होता. त्यावेळी रवी पुजारी हा छोटा राजन टोळीसाठी काम करीत होता. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचा खात्मा करणार असल्याची जाहीर वाच्यता करुन रवी पुजारी चर्चेत आला होता.
पुढे 2005मध्ये त्यानं वकील माजिद मेमन यांच्यावर आपल्या हस्ताकांमार्फत हल्ला घडवून आणला होता. या काळात मुंबई अंडरवर्ल्डमध्ये त्यानं आपली पकड मजबूत केली. मात्र, पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी 2008 मध्ये त्यानं भारतातून पळ काढला आणि मलेशिया तसंच ऑस्ट्रेलियात आपलं बस्तान बसवलं. तिथूनचं तो आपल्या टोळीची सूत्र हलवू लागला.
गेल्या दोन दशकात मुंबईत त्यानं आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळं 2018 मध्ये तो पुन्हा एकदा चर्चेत आला. पण आता दक्षिण आफ्रिकेत त्याच्या मुसक्या आवळ्यामुळे लवकरच भारतीय तपास यंत्रणा त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास रवी पुजारी आणि त्याच्या टोळीची मुंबईतील दहशत कायमची संपणार आहे.
===============================================